
सामना ऑनलाईन । वाराणसी
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शुक्रवार, 26 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून दाखल करणार आहेत. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, जदयुचे नेते, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, शिरोमणी अकाली दलाचे नेते, पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल, लोकजनशक्ती पार्टीचे नेते रामविलास पासवान हे मित्रपक्षांचे नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपतर्फे सुषमा स्वराज, पीयूष गोयल, जे. पी. नड्डा, नितीन गडकरी हे नेते उपस्थित राहतील असे सूत्रांनी सांगितले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी मोदी हे गुरुवार, 25 एप्रिल रोजी वाराणसीमध्ये रोड शो काढणार आहेत. यानंतर ते गंगा आरतीमध्ये सहभागी होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.



























































