
सामना ऑनलाईन । मुंबई
कोलंबोत रविवारी झालेला नरसंहार एका महिलेसह 9 आत्मघाती हल्लेखोरांनी घडवला आहे. नॅशनल तौहिद जमातचा म्होरक्या झहरान हाशिम हा स्थानिक मुस्लीम धर्मप्रचारक या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आठ हल्लेखोरांची ओळख पटली असून नववी हल्लेखोर ही यातील एकाची पत्नी आहे. या प्रकरणी आतापर्यंत 60 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, मृतांची संख्या 359 झाली आहे.
रविवारी झालेल्या 9 साखळी बॉम्बस्फोटांत स्थानिक संघटना नॅशनल तौहिद जमातचा हात नसून त्यातून फुटून वेगळी संघटना स्थापन केलेल्या संघटनेचा हात असल्याचे आज संरक्षणमंत्री रुवान विजेवर्धने यांनी स्पष्ट केले. हा हल्ला आम्ही केला असल्याचे इसिसने म्हटले असले तरी परदेशी संघटनेचा यात हात असल्याचा कोणताही पुरावा मिळाला नसल्याचे त्यांनी सांगितले. बॉम्बस्फोटांनंतर अजूनही कोलंबो आणि श्रीलंकेत नागरिकांमध्ये दहशत कायम आहे. ‘अजूनही सगळी स्फोटके सापडलेली नाहीत. त्यामुळे लोकांनी सावध राहावे,’ असा इशारा सरकारने दिला आहे.
झहरान हाशिम कटाचा सूत्रधार?
नॅशनल तौहिद जमातचा म्होरक्या झहरान हाशीमचे सोशल मीडियावर हजारो फॉलोअर्स आहेत. तो नेहमी कट्टरवादाबाबत बोलत असतो. कुराणाच्या नावाखाली हा तरुणांना भडकावत असल्याची माहिती तीन वर्षांपूर्वी पोलिसांना दिली होती, असे श्रीलंकेतल्या मुस्लीम काऊन्सिलच्या उपाध्यक्षाने सांगितले.
हल्लेखोर उच्चशिक्षित
हल्लेखोर हे उच्चशिक्षित असून ते सुखवस्तू कुटुंबातील आहेत. ते स्वतःही आर्थिकदृष्टय़ा सबळ होते. एका हल्लेखोराने इंग्लंडमध्ये जाऊन शिक्षण घेतले. त्यानंतर पदव्युत्तर शिक्षण ऑस्ट्रेलियात केले असल्याचा दावा पोलिसांनी केला.



























































