
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून बालाकोटमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर पाच स्पाईस बॉम्ब 26 फेब्रुवारीमध्ये फेकले. त्यापैकी चार बॉम्बनी दहशतवाद्यांच्या छावण्यांचा अचूकपणे वेध घेतला. यामुळे हा हल्ला अतिशय परिणामकारक झाल्याचे समोर आले आहे. हिंदुस्थानने केलेल्या एअर स्ट्राईकमुळे आमचे काहीही नुकसान झाले नाही अशी बोंब करणाऱ्या पाकिस्तानचा खोटेपणा यातून सिद्ध झाला आहे.
भारतीय हवाई दलाची बैठक 11 व 13 एप्रिल रोजी दिल्लीत झाली. या बैठकीस संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन या उपस्थित होत्या. त्यावेळी या हवाई हल्ल्याबाबतची आणखी काही माहिती या बैठकीत देण्यात आली. स्पाईस 2000 हे इस्रायल निर्मित बॉम्ब आहेत. असे सहा बॉम्ब पाकडय़ांच्या दहशतवादी अड्डय़ांवर टाकण्याचे हिंदुस्थानी हवाई दलाचे नियोजन होते पण काही तांत्रिक कारणामुळे एक बॉम्ब टाकण्यात आला नाही अशी माहितीही या बैठकीतून समोर आलेली आहे.
14 फेब्रुवारी 2019 रोजी जम्मू-कश्मीरच्या पुलवामामध्ये जैश-ए-महंमद या संघटनेने सीआरपीएफ जवानांच्या वाहनांवर दहशतवादी हल्ला केला. यामध्ये 40 जवान शहीद झाले. या हल्ल्याचा सूड उगवण्यासाठी हिंदुस्थानने बालाकोटवर हवाई हल्ला केला.



























































