वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्प रखडणार, कांदळवन कत्तलीमुळे हायकोर्टाने परवानगी नाकारली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mumbai-highcourt

सामना प्रतिनिधी, मुंबई

वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्पाकरिता जुहू येथे कास्टिंग यार्ड उभारण्यासाठी एमएसआरडीसीने मागितलेली परवानगी आज मुंबई उच्च न्यायालयाने नाकारली. कांदळवनांची कत्तल होत असल्यामुळे हे काम बेकायदेशीरही ठरवले. दरम्यान, न्यायालयाच्या या आदेशामुळे मात्र वर्सोवा-वांद्रे सी लिंक प्रकल्प रखडण्याची चिन्हे आहेत.

जुहू-कोळीवाडा किनाऱ्यावर वांद्रे वर्सोवा सी लिंकच्या कामासाठी लागणारे सिमेंटचे पिलर्स, बीम, गर्डर्स तयार करण्यासाठी कास्टिंग यार्ड उभारण्यात आले आहे. त्यासाठी सुमारे 7.9 हेक्टर जागा ताब्यात घेण्यात आली असून या जागेवरील कांदळवनांची कत्तल करण्यात आली आहे. किनाऱयावर मातीचा ढिगारा टाकण्यात आल्यामुळे उरलेल्या कांदळवनांना समुद्राचे पाणी मिळत नसल्याने ही कांदळवनेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ता झोरू भातेना यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्त्यांची बाजू मांडणाऱ्या ऍड. गायत्री सिंग यांनी कोर्टाला सांगितले की, किनाऱयावर टाकण्यात आलेल्या मातीमुळे समुद्राचे पाणी उर्वरित कांदळवनांना मिळेनासे झाल्यामुळे कांदळवनांचा बळी जाणार आहे. याशिवाय वन विभागाची परवानगीही घेण्यात आलेली नाही. एमएसआरडीसीकडून बाजू मांडताना कोर्टाला सांगण्यात आले की, सीआरझेडकडून यासंदर्भात सर्व त्या आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे याचिककर्त्यांच्या दाव्यात काहीही तथ्य नाही.