आठवणींचा कॅलिडोस्कोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> नमिता दामले

विजयराज बोधनकर यांचा गागरा त्यांच्या बालपणीचे शब्दचित्र रेखाटतो. त्यांच्यातला चित्रकार या लेखनामधून सशक्तपणे व्यक्त होतो. हा गागरा वाचताना बालपणीच्या जीवनामध्ये झालेले संस्कार आणि त्यातून आकाराला आलेली चित्रकला यांच्यामध्ये आपणही सहज रमत जातो आणि नकळत आपल्या आठवणींचा धांडोळा घेऊ लागतो.

अंगण, देवालय, शाळा, काकड आरती, घरं आणि लेखकाचे भाग्यांक यांमधून लेखक वेगवेगळे विषय मांडतो. अंगणातले वेगवेगळे खेळ, विविध रूपांमध्ये वेगवेगळय़ा ऋतूंमध्ये दिसणारे अंगण एका वेगळय़ाच विश्वामध्ये घेऊन जाते. पावसाळय़ातलं हिरवंगार अंगण मन ओलं करतं तर उन्हाळय़ातील वाळवणं जिभेवर चव चाळवतात. अंगणातले झोपाळे, अंगणातले भोंडले आणि अंगणातला बहर, अंगणातली गाणी, अंगणातील चंद्र प्रकाशात न्हायलेली रात्र आणि उगवतीला उजळलेली पहाट हे सारे अंगणाशी गुंतलेले भावमय अंतरंग अगदी अलगद उलगडत जाते. मनात घर करणारी घरं आणि त्यांचे स्वभाव गावातल्या जीवनातील एकोपा व समरसताही दाखवतात. वडिलांची सचोटी, आईचा व्यवहार, आईचा खंबीर आणि कष्टाळू स्वभाव यातून लेखक घडत जातो.

मंदिरातल्या सोयरीकी लग्न जमविण्याच्या पारंपरिक पद्धती हलक्याफुलक्या भाषेत रंगवितात. ‘मंदिरातले मामा’मध्ये सण, उत्सव साजरे करताना मिळणारा निखळ आनंद ओसंडून वाहतो आणि नकळतच आपण आजच्या प्रत्येक उत्सवाला आलेल्या बाजारू आणि उपद्रवी स्वरूपाने आपण खिन्न होतो. लेखकाचे चित्रवेड आणि त्या चित्रांमुळे असणारी आजोळची ओढ. पहिले चित्र त्याच्याशी जुळलेले भावबंध हे सारे खास आहे. ‘गागरा’ या दिवाळी अंकामधून प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह आहे. त्यामुळे एकाच स्थळाचे किंवा व्यक्तीचे उल्लेख वेगवेगळय़ा संदर्भात येतात. स्मरणरंजनात हरवून जाण्यासाठी ‘गागरा’ जरूर वाचावे.

गागरा
लेखक – विजयराज बोधनकर
प्रकाशक – डिंपल पब्लिकेशन, वसई रोड
पृष्ठs – 226 रुपये, मूल्य – 250