
सामना प्रतिनिधी । जिंतूर
गेल्या चार वर्षांपासून दुष्काळी परिस्थितीचा सामना करीत असलेल्या जिंतूर तालुक्यात यावर्षी अपूरा पाऊस व परतीच्या पावसाने दगा दिल्याने दुष्काळाच्या झळा सर्वाधिक तीव्र झाल्या आहेत. पीक उत्पादनात घट आल्याने शेती व्यवसाय अडचणीत आला आहे. ग्रामीण भागात अनेक ठिकाणी नोव्हेंबरपासूनच पाणीटंचाईने तोंडवर काढले आहे. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ऊन्हाची तीव्रता दिवसेंदिवस अधिक होत असल्याने भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे. त्यामुळे ऊन्हाच्या चटक्यासोबतच पाणीटंचाईच्या झळा तीव्र होत आहेत. महिलावर्गास पाण्यासाठी कडाक्याच्या ऊन्हात पायपीट करावी लागत असल्याचे विदारक चित्र ग्रामीण भागातून पहावायास मिळत आहे. शिवाय पशुधनाच्या चारा-पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे.
सद्यस्थितीत तालुक्यात शोभेच्या ठरलेल्या तेवीस गावे, सोळा गावे, बारा गावे या संयुक्त प्रादेशीक पाणीपुरवठा योजनांव्यतिक्त 136 ग्रामपंचायती अंतर्गत जलस्वराज्य, भारत निर्माण, मुख्यमंत्री व राष्ट्रीय पेयजलसह वेगवेगळ्या कार्यक्रमांतर्गतच्या सुमारे 200 ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत. या पैकी किमान 100 योजना पाण्याअभावी बंद पडल्याने गावे, वाड्या, वस्त्या, तांड्यावर भीषण पाणीटंचाईच्या झळा गडद झाल्या आहेत. जमीनीतील पाणीपातळी खोल गेली असल्याने भूप्रष्ठावरचे लघु प्रकल्पासह इतर पाणवठे कोरडेठाक पडले आहेत. पाणी उपलब्ध असलेल्या विहिरींच्या पाण्याने तळ गाठला असून ऊन्हाळी पिकांसाठीचे शेतशिवार मोकळे राहिले असल्याचे चित्र उत्तर, पश्चिम भागात दिसत आहे. काही सुरू असलेल्या योजनाही बंद पडल्या आहेत. तर अनेक योजना बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे मजूरदार वर्ग, महिला, शाळकरी, मुलेमुली यांना अक्षरश: दूरवरुन हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ आली आहे. रोजंदारी करणाऱ्यांना दिवसभाराचे काम सोडून पाण्यासाठी पायपीट करावी लागल्याने त्यांच्या रोजगारावर पाणी सोडावे लागत आहे.
तालुक्यात चार संयुक्त प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व्यतिरिक्त जलस्वराज्य, भारत निर्माण, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय पेयजलसह इतर योजनांतर्गतच्या मिळून 192 ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत. पैकी पाण्याअभावी शंभरपेक्षा जास्त योजना बंद पडल्या. 965 हातपंपा पैकी जवळपास 700 पंप वेगवेगळ्या कारणांमुळे बंद आहेत. 995 हातपंप, विंधन विहिरीपैकी700 पेक्षा जास्त पंप कोरडे पडले. अशा परिस्थितीत टंचाईग्रस्त भागातील जनतेला पिण्यासाठी पुरविण्याकरिता प्रशानातर्फे विविध उपाययोजना आमलात आणल्या जात आहेत. 38 गावांमधून खाजगी विहिरी, बोअर अधिग्रहित करण्यात आले. मांडवा या आदिवासी गावासह सहा ठिकाणी टँकरने पाणी पुरविण्यात येत असून 24 योजनांच्या विशेष दुरुस्तीला मंजूरी दिली तर कांहीं ठिकाणी नवीन योजना मंजूर केल्या आहेत. असे असताना सध्याच्या भिषण पाणीटंचाईमुळे उपाययोजना अपुऱ्या पडत आहेत.
सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा
सहा गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा तालुक्यातील मांडवा या आदिवासी गावासह कोरवाडी, करवली, देवसडी, मोहाडी, वाघी-धानोरा या सहा गावांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यात येत असून भोसी, वडी, घागरा गावांसाठी सेलू येथे उपविभागीय कार्यालयास टँकरचे प्रस्ताव पाठविले असल्याची माहिती पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून समजली आहे. शहरातदेखील पाणीपुरवठा व्यवस्थित नाही. पालिकेचे पाणी वितरणाचे वेळापत्रक कोलमडल्याने कोणत्या भागात चार तर कोणत्या भागात सहा किंवा त्यापेक्षाही जास्त दिवसांनी नळाला पाणी येत आहे. नागरिकांची पाण्यावाचून गैरसोय होत असून अनेकांना खाजगी पाणी विक्रेत्याचा आधार घेण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे पाण्याचे टँकर, जारच्या पाण्याची मागणी वाढली. संधीचा फायदा घेत पाणी विक्रेत्यांनी भाव वाढविले.






























































