माजलगावात तापमानात विक्रमी वाढ, पारा 46 वर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । माजलगाव

मागील संपुर्ण आठवड्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढली असून रविवारी माजलगावच्या इतिहासात प्रथमच तापमान तब्बल 46 अंशावर पोहोचले. त्यामुळे रस्त्यावर प्रचंड उष्णतेच्या लाटा जाणवत होत्या.

यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासूनच सूर्याचा प्रकोप सुरू आहे. पहाटे साडेसहाला सूर्य उगवल्यापासूनच उन्ह भाजून काढत आहे,पारा 30 अंशापासून सुरू होत असून रविवारी सकाळी दहा वाजता तापमान 40 अंश नोंदवले तर दुपारी साडेबारा वाजता 44 अंश व त्यानंतर 3 वाजल्यापासून तब्बल 46 अंश एवढे विक्रमी तापमान नोंदवले गेले. काल शनिवारी 45 अंशाची नोंद झाली होती. दोन दिवसांपासून वाढलेल्या या तापमानात लोक उकाड्याने हैराण झाले आहेत. रस्त्यावर शुकशुकाट आहे. तर घराघरात पंखे व कुलर सुरू असले तरी भिंती व घराचे छत गरम वाफा सोडीत असल्याने अंगाची लाहीलाही होत आहे. या उन्हाच्या पाऱ्याने एका ग्रामीण भागातील दूध विक्रेत्या शेतकऱ्याची मोटरसायकल अचानक पेटल्याचे समजते.