
सामना प्रतिनिधी । शिर्डी
लोकसभा मतदार संघासाठी आज सकाळी सात वाजता सर्व मतदान केंद्रावर मतदान सुरु झाल्यानंतर दिवसभरात मतदारांचा चांगला उत्साह दिसून आला. दिवसभरात सुरळीत व शांततेत मतदान झाले. सायंकाळी पाच वाजेपर्यंत 55.60 टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक यंत्रणेकडून प्राप्त झाली आहे.
शिर्डी लोकसभेसाठी 20 उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाने यावर्षी दिव्यांग मतदारांना विशेष व्यक्तींचा दर्जा दिल्याने दिव्यांग मतदार, महिला मतदार, नवमतदारांनी स्वयंस्फुर्तीने मतदान केल्याने अनेक मतदान केंद्रावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. शिर्डी लोकसभा मतदारसंघातील 1710 मतदार केंद्रांवर सकाळी मॉकपोल घेऊन सात वाजेपासून मतदानास प्रारंभ झाला. मतदानामध्ये महिलांचा सहभाग वाढावा यासाठी मतदार संघातील विविध मतदान केंद्रांवर पाळणाघराची देखील व्यवस्था करण्यात आली.

सकाळपासूनच प्रथमच मतदान करीत असलेल्या तरुण, तरुणीमध्ये उत्साह जाणवत होता. अनेक केंद्रावर मतदान करण्यासाठी महिला व पुरुषांसह तरुण व तरुणींच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. शिर्डी येथील कु. मयुरी देशमुख हिने प्रथम मतदानाचा हक्क बजावत असल्याचे सांगितले. शिर्डी येथील साईनाथ विद्यालय, पिंपळवाडीचे सखी मतदान केंद्र. शारदा विद्या मदिंर राहाता येथील सखी मतदान केंद्र व कोपरगाव येथील डॉ. सी.एम. मेहता कन्या विद्या मंदिर येथे व संगमनेर, अकोले तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरी भागातही मतदारांमध्ये मतदानासाठी मोठया प्रमाणात उत्साह दिसत होता. कोपरगाव येथे 92 वर्षाचे श्री. प्रेमसुख बंब या आजोबांनी आपल्या कुटुंबियांसह उत्साहात मतदान करुन आजच्या तरुण पिढीला मतदानासाठी प्रोत्साहन दिले. अनेक मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बाजवला. जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व महिला मतदारांना स्वयंसेवक स्वयंस्फुतीने मदत करताना दिसत होते.






























































