
सामना प्रतिनिधी, मुंबई
दिव्यांग मतदारांसाठी यंदा मतदान केंद्रांवर विविध सोयीसुविधा असणार असे जाहीर करण्यात आले होते; परंतु प्रत्यक्षात अपंग आणि वृद्धांना साध्या व्हीलचेअरचीदेखील मतदान केंद्रावर सोय नव्हती.
यंदा दिव्यांग मतदारांसाठी मतदान केंद्रावर विविध सोयीसुविधा असणार असे निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. यंदा 2 हजार अपंग मतदार मुंबईत आपल्या मतदानाचा हक्क बजावतील असे सांगितले जात होते; परंतु प्रत्यक्षात मतदान केंद्रावर अपंगांना तसेच अंथरुणावर खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकांना मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनाच धावपळ करावी लागत होती. घाटकोपर पूर्व, चित्तरंजन नगर मतदान केंद्र क्र. 128 वर हरकिसनदास पारेख या नव्वदीच्या अंथरुणाला खिळलेल्या ज्येष्ठ नागरिकास शिवसैनिक माजी उपविभागप्रमुख प्रकाश वाणी यांनी पुढाकार घेऊन मतदान केंद्रापर्यंत आणले, त्यावेळी तेथे अशा व्यक्तींसाठी कोणतीही सुविधा नव्हती.
मोबाईलवर बंदी, मग सेल्फी कशी काढणार…
मतदान केंद्रावर तरुण मतदारांसाठी सेल्फी पॉइंट उभारण्यात येणार असल्याचे आधी जाहीर करण्यात आले होते. मात्र मतदान केंद्रावर मोबाईल फोनवर बंदी टाकून निवडणूक अधिकाऱ्यांनी आधीच्या निर्णयाला हरताळ फासला. जर मोबाईलवर बंदीच घालणार होते, तर मग सेल्फी पॉइंट उभारण्यास काहीच अर्थ नव्हता असे युवावर्ग बोलत आहे.
भविष्यातील सेवा, सुविधा आणि विकासासाठी मतदान
पुढील पाच वर्षांत आपल्याला कोणत्या सेवा, सुविधा हव्यात, कोणती विकासाची कामे हवी आहेत, ती मिळवण्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करण्यासाठी आज मी आणि माझ्या पत्नीने मतदानाचा हक्क बजावला, असे मत अभिनेता मिलिंद गुणाजी यांनी व्यक्त केले. नागरिकांनी आपल्या मताचे दान करण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्षाने आपण दिलेली आश्वासने पूर्ण करण्याचे कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडायला हवे.

























































