समर्थच्या मल्लखांब शिबिराला दणदणीत प्रतिसाद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

श्री समर्थ व्यायाम मंदिर, दादर ही संस्था व्यायाम व शारीरिक शिक्षण क्षेत्रात गेली 95 वर्षे अहर्निश कार्यरत आहे. या संस्थेच्या वतीने यंदा 18 ते 27 एप्रिल 2019 या कालावधीत ‘45 वे समर्थ वासंतिक क्रीडा प्रशिक्षण शिबीर’ शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आले होते. हे हिंदुस्थानातील सातत्याने चालविलेले सर्वात जुने व सर्वात मोठे शिबीर म्हणून ओळखले जाते. 5 ते 85 वर्षे या वयोगटांतील सुमारे 2,000 शिबिरार्थींनी यामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. संस्थेतील 200 हून अधिक राज्ये व राष्ट्रीय दर्जाचे निष्णात खेळाडू या शिबिरात रोज सकाळी 7 ते 9 व संध्याकाळी 5 ते 7 या वेळात शिबिरार्थींना विविध खेळांच्या मूलभूत कुवतींचे प्रशिक्षण दिले.

या प्रसंगी शिबिराच्या 10 दिवसांत शिकलेल्या विविध कौशल्यांची प्रत्यक्षिके शिबिरार्थींनी सादर केली. शरीरतापन व्यायामप्रकार, सूर्यनमस्कर, रोप मल्लखांब, पोल मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स आणि ईडल्सचे सुंदर प्रात्यक्षिक सादर केले. आसाम, छत्तीसगड व पिंपळदहून आलेल्या शिबिरार्थींचे दोरीच्या व पुरलेल्या मल्लखांबावर विशेष प्रात्यक्षिक झाले. त्याचबरोबर समर्थच्या शिक्षकांनी ज्युदो, दोरीचा मल्लखांब, जिम्नॅस्टिक्स, हत्यारी व पलित्यांच्या मल्लखांबाचे आकर्षक प्रात्यक्षिके सादर केली.

सर्वोत्तम शिबिरार्थी व शिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देण्यात आली. सुमारे 2000 शिबिरार्थी त्यांचे 2,000 पालक व सुमारे 100 खास निमंत्रित असा भव्य क्रीडाप्रेमी समुदाय त्यावेळेस उपस्थित होते. या शिबिराचा समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून अश्विन अरविंद दोडे (उद्योगपती), संस्थेचे अध्यक्ष डॉ. दिलीप साठे, कार्याध्यक्ष अनंत भालेकर व मुख्य प्रशिक्षक व मानद प्रमुख कार्यवाह उदय देशपांडे उपस्थित होते.