
सामना ऑनलाईन, मुंबई
ट्विटरवर संताप व्यक्त करण्यासाठी ट्विटरचाच वापर केला जाण्याचे दुर्मीळ उदाहरण सध्या पाहायला मिळतंय. देशभरात सध्या #bringbackTrueIndology हा विष्य़ टिटरवरील ट्रेंडींग विषयांमध्ये बघायला मिळतोय. @Trueindology हे इतिहासाच्या चुकीच्या दाखल्यांची पोलखोल करणारे ट्विटर अकाऊंट आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाची हेतुपुरस्पर खोटी माहिती पसरवणाऱ्यांचे हे अकाऊंट जाहीर वाभाडे काढते आणि त्यांची चूक दाखवून देते. या अकाऊंटचे लाखो फॉलोअर्स असून सध्या हे अकाऊंट बंद करण्यामागे केंद्रातील एक निलंबित सनदी अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे.
ऑप इंडियाच्या संकेतस्थळाने दिलेल्या वृत्तामध्ये म्हटले आहे की निलंबित सनदी अधिकारी आशिष जोशी यांनी हे अकाऊंट त्यांचे ‘कॉन्टॅक्ट’ वापरून कायमचे बंद करण्याची धमकी दिली आहे. जोशी यांनी शेरवान आणि शेरवानी यांच्यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. हे ट्विट आणि त्यातील माहिती अत्यंत चुकीची असल्याचं @Trueindology या ट्विटर हँडलने ट्विट करून सांगितलं. यामुळे बिथरलेल्या जोशी यांनी माझे अधिकाऱ्यांशी चांगले संबंध आहेत. हे हँडल कोण चालवतं ते शोधून काढेन आणि हे ट्विटर अकाऊंट कायमस्वरुपी बंद करून टाकून अशी धमकी दिल्याचं ऑप इंडियाच्या संकेतस्थळावरील बातमीमध्ये म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी एक पोस्ट व्हायरल झाली होती ज्यामध्ये म्हटलं होतं की गरकनाथ मंदीर हे मुस्लिम शासकाने दान दिले होते. ही पोस्ट बोगस असून त्यातील तथ्ये खोटी आहेत हे या ट्विटर हँडलने पुराव्यानिशी दाखवून दिलं होतं. डाव्या विचारसरणीच्या लोकांकडून जाणारे खोडसाळ दावे, एनडीटीव्ही वाहिनीवरून दाखवली जाणारी खोटी बातमी यांचा समाचार घेत हे सगळे कसे खोटे आहे हे दाखवून दिल्याबद्दल हे अकाऊंट यापूर्वी काहीवेळा तात्पुरते बंद करण्यात आले होते असं ऑप इंडियाच्या बातमीत म्हटलं आहे. जोशी यांना उत्तर दिल्यानंतर ट्विटरने पुन्हा ही कारवाई केली आहे. ही बंदी ताबडतोब उठवा अशी मागणी करत ट्विटरवर मोहीम सुरू झाली आहे.



























































