
सामना प्रतिनिधी, बीड
बीड जिल्ह्यात भीषण दुष्काळ निर्माण झाला आहे ,पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. पाणी पुरवण्यासाठी 750 टँकर दिमतीला असताना घशाला कोरड कायम आहे. त्यातच धरणे ,तलाव कोरडे पडल्याने पाणी कोठून आणावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. निदान नगर जिल्ह्याच्या सीमवेर असलेल्या आष्टी तालुक्याला तरी नगर जिल्ह्यातील उद्ध्भव ठिकाणाहून पाण्याचे टँकर भरू द्या, अशी मागणी नगर जिल्ह्यधिकारी यांच्याकडे केली गेली होती. मात्र समाधानकारक उत्तर न आल्याने आता बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी आयुक्तांकडे मागणी केली आहे.
बीड जिल्ह्यात पाणी प्रश्न पेटला आहे, गावागावात वाड्या तांड्यावर पाणीबाणी निर्माण झाली आहे, संपूर्ण जिल्हा भीषण दुष्काळाचा सामना करत आहे, पाण्याच्या प्रत्येक थेंबा साठी झगडावे लागत आहे. सकाळ पासून रात्री पर्यंत पाण्याच्या शोधात राहावे लागत आहे. टँकरच्या प्रतीक्षेत अख्खे गाव वेशी जवळ बसून असते हे विदारक चित्र गावागावात निर्माण झाले आहे. साडेसातशे टँकर दिमतीला असताना तहान भागत नसून आता तर दुसरी समस्या निर्माण होऊ पाहत आहे. टँकर भरावे कोठे हा प्रश्न निर्माण होत आहे. जिल्ह्यात केवळ एक टक्का पाणी शिल्लक आहे, बाष्पीभवन झपाट्याने होत आहे. दुष्काळाची सर्वात जास्त होरपळ होत असलेल्या आष्टी तालुक्याची मदार सीना आणि मेहकरी प्रकल्पावर अवलंबून आहे. मात्र या तलावाने तळ गाठल्याने जवळ असलेल्या नगर जिल्ह्यातून टँकरने पाणी पुरवठा करण्याचा प्रस्ताव मांडला गेला. नगर जिल्ह्यातील मांडली (ता कर्जत) येथून 17 गावांना, शेवगाव तालुक्यातील अमरापूर येथून 9 गावांना आणि संभाजीनगर रोडवरील इंद्रायणी हॉटेल येथून 12 गावाना टँकर पुरवता येतील. मात्र नगर जिल्हाधिकारी यांच्याकडून मंजुरी मिळत नसल्याने अडचणी येत आहेत. आता यात आयुक्तांनी लक्ष घालावे आणि मंजुरी मिळवून द्यावी अशी मागणी बीडचे जिल्हाधिकारी अस्तिककुमार पांडेय यांनी आयुक्त सुनील केंद्रकर यांच्याकडे केली आहे. काल आयुक्त कार्यालयात दुष्काळी उपाययोजना बाबत बैठक घेतली गेली, त्या वेळी ही मागणी करण्यात आली. या मागणीला मंजुरी मिळाली तर जवळच्या अंतरामुळे टँकर खेपा वाढतील हे नक्की
शुक्रवारी सीनामध्ये पाणी पोहोचेल -आमदार धस
आष्टी तालुक्याची सर्व मंदार सीना आणि मेहकरी प्रकल्पावर आहे. सीना धरणाला कोरड पडल्याने वरून पाणी सोडले जात आहे. शुक्रवारी हे पाणी सीनामध्ये पोहोचेल आणि काही प्रमाणात आष्टी तालुक्यातील दुष्काळी भागाचा प्रश्न सुटेल असा आशावाद आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला.






























































