
सामना प्रतिनिधी । नगर
भंडारदरा-निळवंडे धरणातून तीन मे रोजी पिण्याच्या पाण्यासाठी आवर्तन सोडले जाणार आहे. त्यासाठीचे जलसंपदा विभागाचे नियोजन अंतिम टप्प्यात आले आहे. आवर्तन काळात पाण्याचा अवैध उपसा होऊ नये, यासाठी परिसरातील विद्युत पुरवठा दररोज 20 तास खंडीत केला जाणार आहे. याशिवाय पाण्याची चोरी रोखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
भंडारदरा धरणात एक हजार 602 दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणात एक हजार 142 दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. या दोन्ही धरणातील एकत्रित पाणीसाठा दोन हजार 744 दशलक्ष घनफूट एवढा आहे. त्यामधील मृतसाठा व उष्णतेमुळे पाण्याचे होणारे बाष्पीभवन वजा केल्यास या दोन्ही धरणांमध्ये केवळ दोन हजार दशलक्ष घनफूट पाणीसाठा पिण्याच्या आवर्तनासाठी शिल्लक आहे. हा सर्व साठा जिल्हाधिकार्यांच्या ताब्यात असल्याने जलसंपदा विभागाच्या अधिकार्यांनी नुकतीच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासोबत चर्चा करून धरणातून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यासाठी परवानगी घेतली आहे. त्यानुसार धरणातील दोन हजार दशलक्ष घनफूट पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामधून एकूण तीन आवर्तने देण्यात येणार आहेत.
पिण्याच्या पाण्यासाठीचे पहिले आवर्तन हे तीन मे पासून सुरू करण्यात येणार असून ते सातशे दशलक्ष घनफूटचे असणारे आहे. साधारपणे पाच ते सहा दिवसांचे हे आवर्तन असेल. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एक व 25 जूनच्या दरम्यान एक अशी आणखी दोन आवर्तने धरणातून सोडण्यात येणार आहेत. ही तिन्ही आवर्तने श्रीरामपूरपर्यंत असणार आहेत. पोलीस बंदोबस्तात ही आवर्तने सोडण्यात येणार असून याकाळात दररोज 20 तास विद्युत प्रवाह बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागातून देण्यात आली.
भंडारदरा-निळवंडे धरणातून आवर्तन सोडण्याचे नियोजन पूर्ण होत आले आहे. तीन मे रोजी पहिले आवर्तन देण्यात येईल. दुसर्या व तिसर्या आवर्तनाबाबत पिण्याच्या पाण्याची परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल. या दोन्ही धरणातील पाण्याचे 15 जुलैपर्यंत नियोजन केले आहे.























































