
सामना प्रतिनिधी। मुंबई
गेल्या वर्षी 3 जुलै रोजी अंधेरी येथे गोखले पुलाची पादचारी मार्गिका कोसळल्यानंतर मध्य रेल्वेने 280 एफओबी आणि आरओबीचे सुरक्षा ऑडिट केले. आयआयटी मुंबईच्या मदतीने केलेल्या या सुरक्षा ऑडिटचा अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याचे माहितीच्या अधिकारात उघडकीस आले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने या सुरक्षा ऑडिटवर तब्बल 3.37 कोटी रुपये खर्च केला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मध्य रेल्वे प्रशासनाकडे एफओबी आणि आरओबीच्या सुरक्षा ऑडिटची माहिती मागितली होती. मध्य रेल्वेच्या पूल विभागाने एफओबी आणि आरओबीची सुरक्षा ऑडिटची माहिती गुप्त असून बाह्य एजन्सीला ती दिली जात नसल्याचे सांगितले. दरम्यान, हा सुरक्षा अहवाल जनतेच्या पैशातून तयार केला असल्याने तो सार्वजनिक करण्याची मागणी गलगली यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून केली आहे.




























































