राणीच्या बागेत आले ड्रोगन आणि पिंटो

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

सध्या मुंबई, ठाण्यात भरवस्तीत बिबटय़ा घुसल्याची, त्याने शॉपिंग केल्याची आणि हॉटेलिंग केल्याच्या घटना अलीकडेच घडल्या. मुंबईत एका शाळेत बिबटय़ा घुसल्याची घटना घडली होती. पण हाच रुबाबदार… आक्रमक… आणि डौलदार बिबटय़ा मुंबईकरांना याचि देही आणि याचि डोळा पाहायला मिळणार आहे. तेदेखील न घाबरता… कारण राणीच्या बागेत ड्रोगन नावाचा एक नर आणि पिंटो नावाची एक मादी असे दोन बिबटे आणण्यात आले आहेत.

हे दोन्ही बिबटे मंगलोरच्या पिलीकुलालू प्राणिसंग्रहालयातून आणण्यात आले असून त्यांना महिनाभर डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर मुंबईकरांसाठी हे बिबटे खुले करून देण्यात येतील. मुंबईकरांना त्यांना पाहता येईल. त्यांच्यासाठी नवीन पिंजराही तयार करण्यात आल्याची माहिती वीर जिजामाता उद्यानातील वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली. यातील नर हा दोन वर्षांचा तर मादी ही साडेतीन वर्षांची आहे.

रोज साडेतीन किलो बीफ आणि चिकन

दोन्ही बिबटय़ांना रोज साडेतीन किलो बीफ आणि चिकन देण्यात येते. दोन्ही बिबटे अत्यंत आक्रमक आहेत. त्यामुळे कर्मचाऱयांना आणि डॉक्टरांना त्यांच्याजवळ जाताना तसेच त्यांना हाताळताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. त्यांना वेळच्या वेळी आहार द्यावा लागत असून महिनाभर त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.