
सामना प्रतिनिधी । नांदेड
महाराष्ट्रात येण्यासाठी आजही कर्नाटक राज्य सीमेवरील 40 लाख मराठी भाषिक टाहो फोडत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे पालक मंत्री रामदास कदम यांनी केले. महाराष्ट्रदिनी पोलीस कवायत मैदानावर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी अरुण डोंगरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक काकडे, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रकाश मुत्याल,पोलीस अधीक्षक संजय जाधव आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ.अक्षय शिंदे यांची उपस्थिती होती.
प्रारंभी रामदास कदम यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. राष्ट्रगीत धून वाजवून पोलीस वाद्य वृदाने सलामी दिली. कवायत समादेशक पोलीस उप अधीक्षक धनंजय पाटील यांच्या विनंतीने रामदास कदम कवायत निरीक्षण केले. याप्रसंगी बोलताना रामदास कदम म्हणाले की, मुंबई महाराष्ट्रात येण्यासाठी 106 हुतात्म्यांनी आपले बलिदान दिले. आजही बेळगाव, धारवाड, निपाणीमधील 40 लाख मराठी भाषिक माणसे महाराष्ट्रात येण्यासाठी टाहो फोडत आहेत. पण सध्या ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. त्या सर्व मराठी भाषिकांना नक्कीच न्याय मिळेल.
दरम्यान, याप्रसंगी नांदेड जिल्ह्यातील 13 पोलीस कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह आणि पुष्प देऊन मंत्री रामदास कदम यांनी त्यांचा गौरव केला.




























































