
सामना प्रतिनिधी । न्हावाशेवा
चिरनेर-खारपाडा मार्गावर चिरनेर हायस्कूलजवळ सिडकोच्या पाण्याच्या पाईप लाईनचा व्हॉल्व्ह उडाल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. बुधवार दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास अचानक हा व्हॉल्व्ह उडाल्याने ऐन पाणी टंचाईच्या काळात लाखो लिटर पाणी वाया गेले. पाईपलाईन फुटल्यामुळे पाण्याचे पाट वाहत होते.
हेटवणे धरणातून नवी मुंबईच्या सिडको हद्दीतील गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी ही पाईपलाईन टाकली आहे. सुमारे दीड मीटर व्यासाची ही पाईपलाईन आहे. या पाईपलाईन मधून मोठ्या दाबाने पाणी पुरवठा होत असतो. बुधवारी संध्याकाळी कोप्रोली ग्रामपंचायतीचे कनेक्शन जोडण्याचे काम सुरू असताना पाईप लाईन उखळली आणि या एअरव्हॉल्व्ह मधून मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती होऊन लाखो लिटर पाणी वाया गेले. पाण्याचे फवारे उंचच उंच उडत होते. ही घटना समजल्यानंतर सिडकोच्या हेटवणे पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन तासानंतर पाणी पुरवठा बंद केला. हेटवणे पाण्याची पाईप लाईन ही बहुतेक ठिकाणी रस्त्याच्या कडेने गेली असल्यामुळे वारंवार अपघात होवून पाण्याची गळती होण्याचे प्रकार घडलेले आहेत. सिडकोचे हेटवणे विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता राजेश हटवार आणि सहाय्यक अभियंता के.डी चांदेवार यांनी यावेळी गळती झालेल्या ठिकाणी भेट दिली. कोणतीही परवानगी न घेता येथे पाईप लाईन जोडण्याचे काम सुरू असल्यामुळे हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.























































