
सामना प्रतिनिधी । आटपाडी
सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील नाथनगरी खरसुंडीत नाथबाबाच्या नावानं चांगभलंच्या गजरात व गुलाल खोबऱ्यांची मुक्त हस्ते उधळण करीत रणरणत्या उन्हात सिध्दनाथांच्या चैत्र यात्रेचा सासणकाठी व पालखी सोहळा संपन्न झाला. सुमारे दोन लाखांहून अधिक भाविकांच्या उपस्थितीत हा सोहळा झाला.
बुधवारी सकाळी मुख्य मंदिरातील नित्योपचार झाल्यानंतर श्री सिद्धनाथांची अश्वारूढ व बाळाईदेवीची सिंहावर आरूढ सालंकृत पूजा बांधण्यात आली होती. सकाळपासून भाविक मिळेल त्या वाहनाने खरसुंडी दाखल होत होते. सकाळी तुरळक असणाऱ्या गर्दीने अकरानंतर वेग घेतला. मंदिरात भाविकांनी दर्शनाकरिता मोठी रांग लावली होती. यावेळी मुख्य मंदिराच्या आवारात वेगवेगळ्या गावच्या सासनकाढ्यांनी पारंपरिक वाद्यांच्या तालावर ठेका धरला होता. सासन काठीवर उपस्थित भाविकांनी चांगभलं च्या जयघोषात गुलाल खोबऱ्यांची उधळण केली.
दुपारी बारानंतर मुख्य सोहळ्यासाठी भाविकांची उत्कंठा वाढीस लागली.दरम्यान गावोगावच्या भाविकांनी समूहाने आरतीसह नैवेद्य अर्पण केला. मुस्लिम व हिंदू भाविकांनी हातात सिंधीच्या झाडाच्या फोका घेऊन नैवेद्य अर्पण करत दर्शन घेतले. दुपारी दोन वाजता देवस्थानचे मानकरी सभापती हर्षवर्धन देशमुख यांचे गावात आगमन झाले .त्यांना धुपारतीसह मंदिरात पाचारण करण्यात आले. यावेळी त्यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला. सभापती देशमुख यांनी दर्शन घेतल्यानंतर मुख्य सोहळ्याची सुरुवात झाली.
































































