
सामना ऑनलाईन । मुंबई
मुंबई ते पुणे वेगवान प्रवासासाठी मध्य रेल्वेने आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्याचे ठरविले आहे. लोणावळा, खंडाळा घाटात बोगद्यांमध्ये दोन्ही इंजिनांच्या चालकांमध्ये योग्य संपर्क होण्यासाठी मध्य रेल्वे प्रथमच ‘लिकी’ केबलचा वापर करणार आहे. या केबलमुळे बोगद्यामध्ये स्वतंत्र वायफाय नेटवर्क तयार होऊन दोन इंजिन ड्रायव्हरमध्ये संवाद घडणे सोपे होणार आहे. त्यामुळे मेल-एक्स्प्रेसना पुढे आणि मागे अशी दोन इंजिने लावून वेगवान आणि सुरक्षित प्रवास घडणार आहे.
मेल-एक्सप्रेसच्या वेगामध्ये वाढ करण्यासाठी मध्य रेल्वेने नुकत्याच सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसला डबल इंजिन लावण्याचा यशस्वी प्रयोग केला आहे. अशा तंत्राला ‘पुश ऍण्ड पुल’ तंत्रज्ञान म्हणून संबोधले जात असून हे तंत्रज्ञान आता मुंबई ते पुणे प्रवास वेगवान करण्यासाठीदेखील वापरण्यात येणार आहे. ‘पुश ऍण्ड पुल’ तंत्रज्ञानात पुढच्या इंजिनचालकात आणि मागच्या इंजिनचालकात ताळमेळ असणे गरजेचे असते. पाठच्या इंजिनाला बँकर असे म्हटले जाते. अशा स्थितीत पुढच्या इंजिनापेक्षा मागच्या इंजिनाच्या वेगात जराही वाढ होऊन चालत नाही. खंडाळा घाटामध्ये मोठमोठे बोगदे असून त्यात वॉकीटॉकीवरील संभाषणात अडथळे येत असतात. अशावेळी या नव्या तंत्रज्ञानाने दोन इंजिन ड्रायव्हरना एकमेकांशी संपर्क साधण्यासाठी मदत होणार आहे.
‘पुश ऍण्ड पुल’साठी मदत होणार
सध्या राजधानी एक्स्प्रेसला पुढे आणि मागे अशी दोन इंजिने लावण्याची ‘पुश ऍण्ड पुल’ चाचणी यशस्वी झाल्याने मुंबई ते पुणे डेक्कन क्वीनलाही असे डबल इंजिन लावण्याचा मध्य रेल्वेचा विचार आहे; परंतु वॉकीटॉकीचा संपर्क तुटत असल्याने अडचण येत आहे. त्यामुळे मध्य रेल्वे खंडाळा-लोणावळा येथील बोगद्यांमध्ये नेटवर्क तुटू नये यासाठी नवीन तंत्रज्ञान वापरले जाणार आहे.
ऑस्ट्रेलियातून आणणार दोन कोटींची केबल!
भारतीय रेल्वे प्रथमच ‘लिकी केबल’ हे तंत्रज्ञान मध्य रेल्वेच्या मार्फत घाटात वापरणार आहे. या केबलला छोटी छोटी छिद्रे असतात. त्यामुळे बोगद्यामध्ये वाय-फायचे स्वतंत्र नेटवर्क तयार होते. त्यामुळे पुढच्या इंजिनातील ड्रायव्हरचा मागच्या इंजिनातील ड्रायव्हरशी संवाद होणे सोपे होईल असे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. ऑस्ट्रेलियावरून त्यासाठी दोन कोटींची ‘लिकी केबल’ आयात करण्यासाठी टेंडर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. लोणावळा आणि मंकी हिल येथील सुमारे दोन किलोमीटरच्या सर्वात मोठय़ा बोगद्यात ‘लिकी’ केबल लावली जाणार आहे.






























































