
सामना ऑनलाईन । नागपूर
1 मे रोजी महाराष्ट्रदिनी गडचिरोली जिह्यातील जांबुरखेडा गावातील नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात 16 जवान शहीद झाले असून या शहीद जवानांमध्ये पाटोदा शहरातील क्रांतिनगर भागातील रहिवासी असलेले शेख तौसीफ आरिफ हे जवान शहीद झाले असून पाटोदा शहरात ही बातमी कळताच संपूर्ण शहरावर शोककळा पसरली आहे.
तौसिफ शेख हे 2010 साली गडचिरोली पोलीसमध्ये शिपाई पदावर भरती झाले होते. 26 एप्रिल 2011 साली त्यांची गडचिरोली जिह्यात नियुक्ती झाली होती. त्यांना आपल्या कार्यकाळात मोठा पराक्रम गाजवला होता तब्बल सहा वेळा नक्षलवाद्यांशी झुंज देत तीन वर्षांतच त्यांनी पाच नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यांना पोलीस महासंचालकांनी पदक देऊन गौरविले होते. त्यानंतर पाटोदा शहरात त्यांचा मोठा सत्कारदेखील करण्यात आला होता. आज नक्षलवाद्यांनीघडवून आणलेल्या भूसुरुंग स्फोटात ते शहीद झाले. तौसिफ शेख यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे.


























































