दुधगाव येथे क्षुल्लक वादातून तिघांना चाकूने भोसकले; चौघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । बोरी

सकाळी झालेला वादाचा मनात राग धरून आपल्या मित्रांना बोलावून तिघांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना जिंतूर तालुक्यातील दुधगाव येथे घडली. या प्रकरणी बोरी पोलिसांकडून सहा आरोपींपैकी चौघांना अटक केली आहे.

दुधगाव येथील दत्ता उत्तमराव राऊत व गावातीलच सय्यद अन्सर सय्यद गफार यांच्यात बुधवारी किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर दुपारी दत्ता राऊत हा झरी येथून दुधगावकडे दुचाकीवरून येत असताना गाड्या थांबवून आरोपींनी त्याला मारहाण केली. त्यांच्या तावडीतून कसेबसे सुटून दत्ताने दुधगाव गाठले व बस स्टँडवरवर हॉटेलमध्ये बसलेले त्यांचे मित्राजवळ आला. तेथे त्याने मित्र गजानन देविदास चव्हाण, अमोल दशरथ राऊत, सचिन सुधाकर राऊत, विकास मधुकर राऊत, शाम उर्फ दत्ता त्र्यंबकराव राऊत यांना मारहाणीची सर्व माहिती सांगितली.

आरोपी असिफ अनिस इनामदार, असिफचा भाऊ अब्दुल, सोहेल दादू इनामदार, सिराज मिश्किन सय्यद व अन्य एक पाठलाग करत तेथे आले. येथे दत्ताचे मित्र आणि त्यांच्या बाचाबाची झाली. यानंतर आरोपींनी तिघांवर चाकूने वार केला. या प्रकरणी गजानन देविदास चव्हाण यांनी बोरी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी सहापैकी चार आरोपींना अटक केली आहे.