सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजप सरकार चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अपयशी ठरले आहे. हे अपयश लपवण्यासाठी लष्करी शौर्याचा फायदा घेत त्यामागे लपण्याचा प्रयत्न ते करत असून हे लाजिरवाणे असल्याची टीका काँग्रेस नेते आणि माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू आहे. या निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या भाजपच्या नेतृत्वातील एनडीएच्या नेत्यांकडे सांगण्यासारखे काहीच नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांनी लष्कराने केलेल्या ‘एअर स्ट्राईक’ कारवाईला प्रचाराचा मुद्दा बनवण्यास सुरुवात केली आहे. यूपीए सरकारच्या काळातही सर्जिकल स्ट्राईक झाले होते; पण आम्ही मतांसाठी त्याचा कधीच वापर केला नाही, असे मनमोहन सिंग यांनी म्हटले आहे.
मुंबईवर झालेल्या ‘26/11’च्या दहशतवादी हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या विरोधात तत्कालीन यूपीए सरकारने कारवाई केली नाही. तेव्हाचे सरकार लष्करी कारवाई करण्यास तयार नसल्याचा भाजपाध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी केलेले आरोप मनमोहन सिंग यांनी फेटाळून लावले आहेत. प्रत्येक परिस्थितीत वेगवेगळय़ा प्रतिक्रियांची अपेक्षा असते. आम्ही पाकिस्तानला पूर्ण वेगळे पाडण्याचा आणि त्यांचा चेहरा जगासमोर उघड करण्याचा निर्णय घेतला होता. त्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला.
दहशतवाद्यांच्या विरोधात निर्णायक कारवाई करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणण्याची भूमिका आम्ही घेतली होती. मुंबई हल्ल्यानंतर 14 दिकसांच्या आत हाफीज सईदला जागतिक दहशतवादी घोषित करण्यात आले. यूपीए सरकारने मुंबई हल्ल्याच्या मास्टरमाइंडवर अमेरिकेकडून 10 लाख डॉलर्सचे बक्षीस जाहीर करून घेतले होते. आमच्या सरकारने सागरी सुरक्षा मजबूत केली आणि राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राची (एनसीटीसी) संकल्पना मांडली; पण गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यास किरोध केल्याचे मनमोहन सिंग म्हणाले.


























































