महापौर बदलाचे पक्षश्रेष्ठींनी दिले संकेत, आचारसंहिता शिथील होताच राजीनामा घेतला जाणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विजय जोशी । नांदेड

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी संपल्यानंतर आता नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौर बदलाच्या घडामोडीला वेग आला असून, यास नांदेड उत्तरचे आमदार डी.पी.सावंत यांनी दुजोरा दिला आहे. आचारसंहिता शिथील होताच महापौरांचा राजीनामा घेतला जाईल आणि नव्या महापौरांची निवड प्रक्रिया 23 मे च्या नंतर कधीही होवू शकेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसातील या घडामोडीमुळे थंड झालेले राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या 2017 साली झालेल्या निवडणूकीत काँग्रेसला 74, भाजपाला 6, शिवसेना 1 आणि अपक्ष 1 अशा 82 जागांचे पक्षीय बलाबल आहे. एका अपक्षाने काँग्रेसला पाठिंबा दिल्याने काँग्रेसचे संख्याबळ 75 वर गेले आहे. मोठ्या प्रमाणात निवडून आलेले नगरसेवक आणि त्यांच्या वाढत्या अपेक्षा लक्षात घेता सुरुवातीलाच सवा सव्वा वर्षाचे पदाधिकारी निवडायचे अशी चर्चाही झाली होती व त्याला पक्षश्रेष्ठींनी संमती दिली होती. 1 नोव्हेंबर 2017 रोजी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या महापौरपदी शिलाबाई किशोर भवरे यांची तर उपमहापौर पदी विनय गिरडे यांची बहुमताने निवड झाली होती. स्थायी समिती पद हे दरवर्षाला बदलत असते. तर महिला बालकल्याण समिती सभापती व उपसभापती पद दरवर्षी नव्याने नियुक्ती केली जाते. निवडणुकीच्या रणधुमाळीत आता 17 महिन्यांचा कालावधी महापौर पदाला झाला आहे. निवडणूक झाल्यानंतर महापौर बदलाच्या प्रक्रियेला वेग आला असून मुंबईला रवाना होण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष तथा खासदार अशोकराव चव्हाण यांनी आयटीएम येथे झालेल्या बैठकीत महापौर बदलाच्या प्रक्रियेला मुक संमती दिल्याचे मानले जाते. याबाबत नांदेड उत्तरचे काँग्रेसचे आमदार तथा माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत यांनी सामनाशी बोलताना सांगितले की, नगरसेवकांची मोठ्या प्रमाणात झालेली निवड आणि काँग्रेसला मिळालेले मोठे यश हे लक्षात घेता अनेकांना संधी देणे गरजेचे आहे. त्यामुळे महापौर बदलाच्या प्रक्रियेला सुरुवात होऊ शकेल. कदाचित आचारसंहिता शिथील होताच महापौर पदाचा राजीनामा घेतला जाईल, असे संकेत त्यांनी दिले. गेल्या तीन दिवसांपासून यासंदर्भात नगरसेवकांनी वरिष्ठांच्या घेतलेल्या भेटी आणि महापौरांबद्दलची नाराजी तसेच महापौर पदाची निवड होताना सव्वा वर्षाचा कालावधी याची आठवण सर्वांनी करुन दिली.

या सर्व पार्श्वभूमीवर राज्यातील आचारसंहिता संपताच महापौर पदाचा राजीनामा घेतला जाईल, त्यामुळे आपोआपच उपमहापौर पदाचाही राजीनामा घेऊन नव्याने निवडीच्या प्रक्रियेला प्रारंभ होवू शकेल. मात्र महापौर पदाची निवड ही 23 मे च्या निकालानंतरच होईल, असे महापालिकेतील एका ज्येष्ठ नगरसेवकाने सामनाशी बोलताना सांगितले. गेल्या वर्षभरात महापौर पदाची कामगिरी, काँग्रेस नगरसेवकांची नाराजी याबाबतचा सूर ज्येष्ठांसमोर आळवण्यात आला. त्यामुळे या प्रक्रियेला वेग आला. मुंबईला रवाना होण्यापूर्वी चव्हाणांनी या प्रक्रियेला हिरवा कंदील दाखविल्याचे मानले जाते. आमदार डी.पी.सावंत यांची प्रतिक्रिया याबाबत बोलकी असून, कदाचित सोमवारी आचारसंहिता शिथील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात महापौरांना आपला राजीनामा द्यावा लागेल, असे संकेत मिळत आहेत. असे असले तरी नव्या महापौरांना दोन महिने कमीच कालावधी मिळणार आहे. महापौर पद हे अनुसूचित जातीतील महिलेसाठी राखीव असून, या पदासाठी आता शिवाजीनगरातून ज्योती सुभाष रायबोले, कदम ज्योती मनिष, पूजा बालाजी पवळे, सोनकांबळे गंगाबाई मल्हारी, कापूरे गितांजली रामदास, धबाले दिशा कपील, गोडबोले ज्योत्सना राजू आणि सौ.गायकवाड चित्रा सिध्दार्थ या अनुसूचित जाती महिला प्रवर्गातून नवा महापौर निवडला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.