
सामना ऑनलाईन। श्रीनगर
सुरक्षा दलाने केलेल्या जबरदस्त कारवाईत कश्मीर खोऱयातील हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर लतिफ टायगरसह तीन दहशतवाद्यांना शुक्रवारी यमसदनी पाठविले. लतिफला कंठस्नान घातल्यामुळे ‘बुरहान वाणी गँग’चा खात्मा झाला आहे. तीन वर्षांपूर्वी दहशतवाद्यांचा पोस्टर बॉय बनलेल्या वाणीचा खात्मा केला होता.
दक्षिण कश्मीरातील इमाम साहिब गावात दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी या परिसराला घेराव घातला. यावेळी चकमक झडली. यात हिजबुल मुजाहिदीनचा कमांडर लतिफ अहमद दार ऊर्फ लतिफ टायगर, तारीक मौलवी आणि शरीक अहमद नेंगरू या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला.
चकमकीवेळी इंटरनेट बंद, रेल्वेही रद्द
क्रूरक्रर्मा दहशतवादी लतिफ टायगरचा खात्मा केल्यानंतर दक्षिण कश्मीरच्या काही भागांत हिंसाचार भडकल्याचे वृत्त आहे. चकमकीवेळी दक्षिण कश्मीरातील चार जिह्यांतील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. तसेच श्रीनगर-बनिहाल मार्गावरील रेल्वेसेवाही बंद केली होती.
बंदोबस्त वाढविला
6 मे रोजी शोपियाँ आणि पुलवामा जिह्यात लोकसभा निवडणुकीचे शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कश्मीर खोऱयात लष्कराचा आणि पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
‘वाणी गँग’चा खात्मा
तीन वर्षांपूर्वी हिजबुलचा कमांडर बुरहान वाणीचा खात्मा करण्यात आला. त्यानंतर कश्मीर खोऱयात मोठा हिंसाचार भडकला होता. सुरक्षा दलांनी गेल्या तीन वर्षांत जबरदस्त कामगिरी करताना वाणी गँगच संपविली. बुरहान वाणी गँगमध्ये 12 दहशतवादी होते. त्यातील वाणी, सद्दाम पँडर, आदिल, नसीर पंडित, अफ्फाक बट, सब्जार बट, अनीस, अश्फाक डार, वसीम मल्ला आणि वसीम शाह या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. दोघेजण शरण आले. शुक्रवारी लतिफचा खात्मा केला. त्यामुळे कश्मीर खोऱयातून वाणी गँगचा खात्मा झाला आहे.

























































