
सामना ऑनलाईन । जयपूर
हिंदुस्थानच्या जवानांनी सर्जिकल स्ट्राइक करत दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारले. त्यावेळी काँग्रेसचे नेते जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करून दहशतवाद्यांचे मृतदेह दाखवा अशी मागणी करत होते. आता तेच काँग्रेसवाले यूपीए सरकारच्या काळात सहावेळा अशा प्रकारची कारवाई केल्याचा दावा करत सर्जिकल स्ट्राइकवरून मी टू मी टू करत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील सिकर येथे आयोजित सभेत बोलताना लगावला.
काँग्रेसच्या नामदारांनी काल आपला रिमोट सुरू केला आणि त्यानंतर काही वेळातच यूपीए सरकारच्या काळातदेखील सहा वेळा सर्जिकल स्ट्राइकची कारवाई झाल्याची ओरड सुरू झाली आहे. या कारवाईची ना दहशतवाद्यांना, ना पाकिस्तानला माहिती ना भारतीयांना. भाजप सरकारच्या काळात दहशतवाद्यांच्या विरोधात हिंदुस्थानने केलेल्या कारवाईबाबत व जवानांच्या शौर्यावर शंका उपस्थित करणाऱ्यांना निवडणुकीत योग्य धडा शिकवा, असे आवाहन मोदी यांनी केले. वातानुकूलित खोलीत बसून कागदावर सर्जिकल स्ट्राइक फक्त काँग्रेसच करू शकत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले की 600 वेळा सर्जिकल स्ट्राइक केल्याचा दावा काँग्रेसवाले करतील अशी खिल्ली मोदी यांनी उडवली.
काँग्रेस सत्तेत असताना दहशतवादी हल्ले नित्याचेच होते
दहशतवाद्यांशी लढा देताना राजस्थानमधील अनेक मातांनी आपली शूर मुले गमावली आहेत, पण आता दहशतवाद्यांना पाकिस्तानमध्ये राहणेही मुश्कील झाले आहे. जेव्हा काँग्रेस सरकार केंद्रात होते तेव्हा दहशतवादी हल्ला होणे नित्याचेच झाले होते. त्यांच्या कार्यकाळात कोणतेही शहर सुरक्षित नव्हते. 2008 मध्ये दहशतवाद्यांनी मुंबईत घडवलेला रक्तपात आणि काँग्रेसी सरकारची बेफिकिरी देशवासीय अजून विसरलेले नाहीत. मुंबईत जे झालं ते पहिले आणि शेवटचे नव्हते असा हल्ला नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात चढवला.
मसूदवरील बंदीसाठी तुम्हाला विचारायला हवं होतं का?
मसूद अझरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केल्याचा आनंद साजरा करण्याऐवजी काँग्रेस स्वतःची खिल्ली उडवून घेत आहे. काँग्रेस विचारणा करत आहे की, निवडणुकीच्या वेळीच हा निर्णय का घेण्यात आला? मोदींच्या कॅबिनेटने तो निर्णय घेतला आहे का? आधी संयुक्त राष्ट्रांनी काँग्रेसला विचारायला हवं होतं का? मॅडमजी, तुम्ही ज्यांना साहेब म्हणून बोलवता त्यांना आम्ही आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करू का? तुम्हाला काही समस्या तर नाही ना? असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मसूदवरील बंदीच्या वेळेवर शंका घेणाऱया काँग्रेसला लगावला आहे. ते राजस्थानमधील भाजपच्या प्रचार सभेत बोलत होते.

























































