रामायण, महाभारतात हिंसा, मग हिंदू हिंसक नसतात हे कसे; सीताराम येचुरींची ‘लाल बुद्धी’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
sitaram-yechuri

सामना ऑनलाईन । भोपाळ

‘रामायण’ आणि ‘महाभारता’त हिंसक घटना आणि युद्धाचा उल्लेख आहे. संघाचे प्रचारक म्हणून ही बाजू सांगितलीच जात नाही, ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ हे महाकाव्य असल्याचे सांगितले जाते. ‘रामायण’ आणि ‘महाभारता’चे दाखले दिल्यानंतरही हिंदू हिंसक नसल्याचा दावा केला जातो. एका विशिष्ट धर्माचे लोकच हिंसा करतात, हिंदू हिंसा करत नाहीत हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. ‘रामायण’-‘महाभारता’तही हिंसा आहे, मग हिंदू हिंसक नसतात हे कसे? असा सवाल उपस्थित करून मार्क्सवादी कम्युनिस्ट (सीपीआयएम) पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे.

लोकसभा निवडणुकीतील पाचव्या टप्प्यातील मतदानाला आता काही दिवस उरले असतानाच वादग्रस्त विधानांचे प्रमाण वाढले आहे. सीपीआय (एम) या पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांच्या विधानाने नवा वाद निर्माण झाला आहे. हिंदू हिंसक नसल्याचा दावा खरा आहे का? असा प्रश्न विचारत येचुरी यांनी थेट ‘रामायण’ आणि ‘महाभारता’चा उल्लेख केल्याने वाद निर्माण झाला आहे.

सीताराम येचुरी हे गुरुवारी मध्य प्रदेशमधील भोपाळ येथे एका कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात येचुरी यांनी हिंदू धर्माविषयी भाष्य करताना थेट ‘रामायण’ आणि ‘महाभारता’चा दाखला दिला. न्याय अथवा धर्मरक्षणासाठी झालेल्या हिंदू पुराणातील युद्धांना हिंसाचाराचे रूप देणाऱया येचुरी यांनी आपली ‘लाल बुद्धी’च भोपाळमध्ये उगाळली अशी टीका हिंदुत्ववादी संघटनांनी केली आहे.

…लक्ष वळवण्यासाठी साध्वींना उमेदवारी

साध्वींना उमेदवारी देऊन भाजपने मूळ मुद्दय़ांवरून लक्ष वळवले. गेल्या पाच वर्षांमध्ये देशात लुटमार करणाऱ्यांचे राज्य आहे. अनेक उद्योगपती आणि व्यापारी बँकांना गंडा घालून पळाले आहेत. लोकसभा निवडणुकीतील तीन टप्प्यांनंतर भाजपला पराभवाचे संकेत मिळू लागले आहेत. या भीतीपोटीच भाजपने साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली. प्रज्ञा यांना रिंगणात उतरवून भाजप मूळ मुद्दय़ांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न करत आहे, असेही येचुरी यांनी म्हटले आहे. या कार्यक्रमात काँग्रेस नेते आणि भोपाळमधील उमेदवार दिग्विजय सिंह हेदेखील उपस्थित होते.