उष्माघाताचे प्रमाण वाढले; परभणी कमाल ४३.२, किमान २३ अशांवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । परभणी

एप्रिल अखेरच्या आठवड्यात परभणी जिल्ह्याचा पारा ४४.५ अंशावर पोहोचला होता. त्या पाठोपाठ आता उष्णतेची लाट येणार आहे, अशी भविष्यवाणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केली आहे. मंगळवार, ७ मे रोजी परभणीत पुन्हा एकदा उष्णतेच्या लाटेने डोकेवर काढले असून तापमानाचा पारा कमाल ४३.२ तर किमान २३ अंशावर गेला आहे. परभणीकर या वाढत्या तापमानामुळे हैराण झाले असून उष्माघाताचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र जिल्हाभरात दिसून येत आहे.

जिल्ह्यात यावर्षी मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून ऊन तापत आहे. तीन दिवसांचा अपवाद वगळता संपूर्ण एप्रिल महिन्यात ४० अंशापेक्षा अधिक तापमानाची नोंद जिल्ह्यात झाली. त्यामुळे उन्हाचा त्रास जिल्हावासियांना सहन करावा लागत आहे. काल २८ एप्रिल रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने रविवारी ४५.५ अंश कमाल तापमानाची नोंद घेतली होती. आज पारा पुन्हा एकदा ४३.२ अंशावर पोहोचला आहे. एकंदर जिल्ह्यात उन्हाचा पारा नागरिकांना त्रस्त करून सोडत आहे. प्रखर सूर्यकिरणांमुळे नागरिकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. दिवसभर शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट जाणवला. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी वाढण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यानेही वर्तविला असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. नागरिकांना दिवसभर कडक उन्हाचा सामना करावा लागत असल्याने जीवाची काहीली होत आहे.

तापमानामध्ये मोठी वाढ होत असल्यामुळे जिल्हाभरातील नदी नाले, ओढे व धरण मागील दोन महिन्यांपासून कोरडेठाक पडले आहेत. त्यातच गावातील हातपंप व विहीर पाण्याअभावी बंद पडल्यामुळे ग्रामस्थांना हंडाभर पाण्यासाठी दाहीदिशा भटंकती करावी लागत असल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे. ग्रामीण भागात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थ हंडाभर पाण्यासाठी गाव शिवारामध्ये एक ते दोन कि.मी. पायपीट करून आणत आहेत. त्यातच उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे ग्रामस्थ सकाळी व सायंकाळी विहीर व बोअरवरून पाणी आणत आहेत. ग्रामस्थांना बैलगाडी अथवा सायकलवरून पाणी आणण्याची वेळ आली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने शेकडो गावांना विहिरींचे अधिग्रहण करून अथवा टँकरव्दारे ग्रामस्थांची तहान भागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने पाणीटंचाई निवारणाची उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याने शेकडो गावातील ग्रामस्थांना भर उन्हामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे विदारक चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे. रखरखत्या उन्हामध्ये ग्रामीण भागत पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने त्वरीत उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.