
सामना ऑनलाईन । मुंबई
पश्चिम रेल्वेवर धावणाऱ्या देशातील पहिल्या उपनगरीय एसी लोकलचे तिकीट दर 31 मेपर्यंत जैसे थे राहणार आहेत. त्यामुळे तिकीट दराची प्रारंभिक सवलत महिनाभर तरी कायम राहणार असल्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे.
25 डिसेंबर 2017 पासून उपनगरीय मार्गावरील देशातील पहिली एसी लोकल सुरू करण्यात आली. चर्चगेट ते विरारदरम्यान एसी लोकलच्या 12 फेऱ्या चालविण्यात येतात. एसी लोकलचे किमान तिकीट जीएसटीसह 60 रुपये तर कमाल तिकीट 205 रुपये इतके आहे. एसी लोकलचे भाडे ठरविताना प्रारंभिक सवलत म्हणून फर्स्ट क्लासच्या एकेरी भाडय़ाच्या 1.2 पट भाडे निश्चित करण्यात आले होते. 25 जून 2018 मध्ये ही प्रारंभिक सवलत संपुष्टात येणार होती, परंतु तेव्हा आणखी सहा महिन्यांसाठी ही सवलत वाढविण्यात आली होती. त्यामुळे डिसेंबर महिन्यात ही सवलत संपून भाडेवाढ होण्याची शक्यता होती, परंतु रेल्वे मंत्रालयाने पुन्हा भाडेवाढीला चार महिने स्थगिती दिली. आता पुन्हा 31 मेपर्यंत एसी लोकलच्या तिकीट दराची सवलत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले.




























































