कुर्ल्यात कचऱ्याचा ढीग घरावर कोसळून एक ठार, एक जखमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

कुर्ल्यात कचऱ्याचा ढीग घरावर कोसळून झालेल्या दुर्घटनेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. यामध्ये एक जण जखमीदेखील झाला आहे. अब्दुल रशीद कुरेशी (48) असे मृताचे नाव आहे. तर 65 वर्षांच्या रहेमादी या वृद्धा जखमी झाल्या आहेत.

कुर्ला पूर्वेकडील कुरेशी नगरमध्ये ही दुर्घटना घडली. या झोपडपट्टीतील रहिवासी काही महिन्यांपासून टेकडीवर कचरा आणि भंगार टाकत आहेत. त्यामुळे कचऱ्याचे मोठमोठे ढीग या ठिकाणी तयार झाले आहेत. यातील टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या घरावर आज दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास कचऱ्याचा ढीग कोसळला. यामध्ये ढिगाऱ्याखाली अब्दुल रशीद कुरेशी आणि रहेमादी 65 वर्षीय महिला दबली गेली. या दोघांनाही ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले. त्यांना शीव रुग्णालयात दाखल केले असता कुरेशी यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर वृद्धा रहेमादी यांच्याकर मुख्य वैद्यकीय अधिकारी वैभव यांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. दरम्यान, संबंधित भागात दाटीवाटीची लोकवस्ती आणि टेकडय़ांवर बेकायदेशीरपणे कचरा फेकून निर्माण झालेल्या ढिगांमुळे धोका निर्माण झाला असल्याचे एका पालिका अधिकाऱ्याने सांगितले.