पाणी टंचाईग्रस्त गावांना शिवसेनेकडून दिलासा, टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena-logo-new

सामना प्रतिनिधी, मालवण

राज्यात सर्वत्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली आहे. तेच चित्र मोठ्या प्रमाणात पाऊस पडणाऱ्या कोकणातही दिसून येत आहे. काही ठिकाणी विहिरींना तळ गाठला आहे तर काही विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सिंधुदुर्गातील टंचाईच्या कामांना आमदार वैभव नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर जिल्हाधिकारी स्तरावर मंजुरी मिळाली. मात्र कामे पूर्ण होण्यास लागणारा काही कालावधी लक्षात घेता सामाजिक जाणिवेतून शिवसेनेच्या वतीने टंचाईग्रस्त गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

टंचाईग्रस्त महान व अन्य गावात टँकर सुरू करण्यात आला आहे. अन्य टंचाईग्रस्त गाव व वाडीवर पाणीपुरवठा केला जाणार आहे. शिवसेनेचे ब्रीदवाक्य 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या नुसार सामाजिक भावनेतून जनतेची गरज लक्षात घेऊन आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून टँकरद्वारे पाण्याची व्यवस्था गावात सुरू असल्याचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी माहिती देताना सांगितले.

किनारपट्टी भागात विहिरींना तळ गाठल्याने क्षारयुक्त पाण्याची समस्या अनेक ठिकाणी निर्माण झाली आहे. किल्ले सिंधुदुर्ग येथील विहिरी आटल्याने त्या ठिकाणीही वायरी ग्रामपंचायतिच्या वतीने पाणीपुरवठा सुरू आहे. सर्व समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी आमदार वैभव नाईक, खासदार विनायक राऊत व पालकमंत्री दीपक केसरकर प्रयत्नशील असल्याचे खोबरेकर यांनी सांगितले.

टंचाईक्षेत्रात 26 कामांना प्राधान्याने मंजुरी
मालवण तालुक्यात पाणी टंचाईच्या झळा सोसणाऱ्या गाव व वाडीवर 42 कामे सुचवण्यात आली होती. यात विंधनविहिर विशेष दुरुस्ती, नवीन विंधनविहिर, नळ योजना विशेष दुरुस्ती, तात्पुरती पूरक नळयोजना, विहीर खोल करणे/गाळ काढणे अश्या एकूण 26 कामांना प्राधान्याने मंजुरी देण्यात आली आहे. उर्वरित कामांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू असल्याचे खोबरेकर यांनी सांगितले.