
सामना ऑनलाईन । पाटणा
गेल्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी हे एनडीएचे पंतप्रधान पदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर जदयूचे नितीश कुमार यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्यानंतर नितीश कुमार यांनी आरजेडीची साथ सोडत मोदींना पाठिंबा दिला. आता एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांनाच निवडून देण्याचे आवाहन केले जात असतानाच घटकपक्ष असलेल्या जदयूतील काही नेत्यांनी आता पुन्हा एकदा नितीश कुमार यांना पंतप्रधानपद मिळावे अशी मागणी सुरू केली आहे. जदयू नेते गुलाम रसूल बलियावी यांनी नितीश कुमारांना पंतप्रधानपदाचे उमेदवार घोषित केले जावे अशी मागणी केले आहे. गुलाम रसूल बलियावी हे नितीश कुमार यांचे खास असल्याने त्यांच्या या मागणीची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.
‘या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदीजींना बहुमत मिळेल असे दिसत नाही. त्यामुळे नितीश कुमार यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार घोषित केले पाहिजे’, अशी मागणी गुलाम रसूल बलियावी यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीबाबत भाजपकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. मात्र या मागणीमुळे भाजप व जदयूमध्ये वितुष्ठ येऊ शकते असे बोलले जात आहे.
नितीश कुमार यांनी अद्याप कधीच पंतप्रधान पदाची इच्छा बोलून दाखवलेली नाही. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदाचे उमेदवार जाहीर केल्यानंतर जदयूने भाजपची साथ सोडली होती. त्यावेळीही नितीश यांना पंतप्रधान पदाची उमेदवारी मिळण्याची अपेक्षा होती असे बोलले जात होते.



























































