
सामना प्रतिनिधी। ठाणे
फार्मासिस्टची पदवी मिळवण्यासाठी मुंबई-ठाण्यातून गेलेल्या 140 विद्यार्थ्यांना राजस्थानमध्ये ‘ओपीजीएस’ विद्यापीठाच्या चालकासह त्याच्या गुंडांनी मारहाण केल्याचा विचित्र प्रकार समोर आला. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांना राजस्थानच्या विद्यापीठात परीक्षा देण्यासाठी पाठवणारा ताहिल रमानी हा स्वत: बोगस फार्मासिस्ट असून विद्यार्थ्यांना दहावी आणि बारावीचे बनावट प्रमाणपत्र तयार करून दिल्याप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने त्याला अटक केली होती, मात्र जामिनावर बाहेर असताना त्याचे गोरखधंदे पुन्हा सुरू झाल्याने पोलिसही चक्रावून गेले आहेत.
ढोकाळी येथील ‘डीपीओज् नीट कॉलेज ऑफ फिजिओथेरेपी’ नावाचे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयाचा अध्यक्ष ताहिल रमानी याने 6 मे रोजी त्याच्या महाविद्यालयामध्ये बी. फार्मसी आणि डी. फार्मसीचे शिक्षण घेणाऱया 140 विद्यार्थ्यांना खासगी बसमधून परीक्षा देण्यासाठी राजस्थान येथील ओपीजीएस् विद्यापीठात नेले होते. 7 मे रोजी राजस्थानला पोहचल्यानंतर विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याची विनंती विद्यापीठाचा प्रमुख जोगिंदर सिंग याच्याकडे केली. त्याने परीक्षा होणार नसल्याचे विद्यार्थ्यांना सांगून तुम्हाला या विद्यापीठात पुन्हा प्रवेश घ्यावा लागेल असे सांगितले, मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा घेण्याचा आग्रह केला. त्यावरून त्याने एका विद्यार्थ्याला काठीने मारहाण केली तर उर्वरित 139 विद्यार्थ्यांना गुंडांच्या मदतीने पिटाळून लावले. या प्रकाराने भेदरलेल्या विद्यार्थ्यांनी बाहेर उभ्या असलेल्या खासगी बसमध्ये बसून पळ काढला.
30 ते 40 जणांविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर ठाण्यात आलेल्या या विद्यार्थ्यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. त्यानुसार ओपीजीएस विद्यापीठाचा अध्यक्ष जोगिंदर सिंग याच्यासह 30 ते 40 जणांविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून हा गुन्हा राजस्थान पोलिसांकडे वर्ग केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

































































