
सामना ऑनलाईन । मुंबई
विधी अभ्यासक्रमाच्या तिसऱ्या आणि पाचव्या वर्षाच्या अभ्यासक्रमामध्ये शिकणाऱ्या 270 विद्यार्थ्यांच्या अंतर्गत पुनर्परीक्षा तातडीने जाहीर कराव्यात अशा युवासेनेच्या मागणीला यश आले आहे. येत्या 14 मे रोजी सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळात पुनर्परीक्षा घेण्यात येतील अशी नोटीस शासकीय विधी महाविद्यालयाने शुक्रवारी काढली. विद्यार्थ्यांनी ओळखपत्र दाखवून त्यांचा परीक्षा क्रमांक घेऊन जावा, असेही या नोटिशीत नमूद करण्यात आले आहे.
युवासेनेच्या सिनेट सदस्यांनी याप्रकरणी मुंबई विद्यापीठाकडे पाठपुरावा केला होता. अंतर्गत पुनर्परीक्षा घेण्यात याव्यात असा निर्णय विद्यापीठाच्या शिक्षण मंडळाच्या बैठकीमध्येही घेण्यात आला आणि त्यासंदर्भात शासकीय विधी महाविद्यालयालाही 4 मे रोजी कळवण्यात आले होते. तरीसुद्धा पुनर्परीक्षा जाहीर करण्यात न आल्याने युवासेनेच्या वतीने शासकीय विधी महाविद्यालयाच्या प्राचार्या सुवर्णा केवले यांना निवेदन दिले होते.



























































