
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकेतील जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिकाच्या मुखपृष्ठावर पुन्हा झळकले आहेत. मात्र यावेळी मोदींचा मुखपृष्ठावरील फोटो हा सकारात्मक लेखासंदर्भात नसून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख ‘टाइम’ने दुफळी निर्माण करणारा हिंदुस्थानातील प्रमुख नेता असा केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदी हिंदुत्वावर आधारित राजकारण करत असल्याने देशात ध्रुवीकरण झाल्याचा आरोप आतिष तासीर यांनी ‘टाइम’ या अमेरिकन मासिकातील आपल्या लेखात केला आहे.
लेखात देशात अल्पसंख्याकांच्या हक्काची पायमल्ली होत असल्याची कोल्हेकुई
मोदींवर टीका करणाऱया या लेखामध्ये 2014 च्या निवडणुकांनंतर देशामध्ये अनेक बदल झाल्याचे म्हटले आहे. एक राष्ट्र म्हणून हिंदुस्थानची वैशिष्टय़े, हिंदुस्थानचे निर्माते, हिंदुस्थानातील अल्पसंख्याक आणि देशातील संस्थांचा कारभार असं सर्व काही विस्कळीत पद्धतीने मांडण्यात येत असल्याची टीका लेखकाने केली आहे. ‘स्वतंत्र हिंदुस्थानने मिळालेल्या सहिष्णुता, उदारमतवादी धोरण, स्वतंत्र प्रसारमाध्यमे यासारख्या गोष्टींही एखाद्या कटाचा भाग असल्याप्रमाणे 2014 च्या निवडणुकांनंतर भासवले जात आहे’ अशी टीका हिरवी कावीळ झालेले लेखक तासीर यांनी केली आहे.
टीका करणाऱया लेखासोबत मासिकात मोदींची स्तुती करणाराही लेख
लेखक तासीर यांनी ‘नरेंद्र मोदी हे 2002 च्या गुजरात दंगलीनंतर शांत राहण्याचा निर्णय घेतल्याने ते एका ठरावीक गटाच्या बाजूने झाले’ असेही आपल्या लेखात म्हटले आहे. तासीर यांच्या लेखाबरोबरच याच आवृत्तीमध्ये मोदी एक बदल घडवणारा नेता असाही लेख इयन बेरीमेर यांनी लिहिला आहे. या लेखाचा उल्लेखही मासिकाच्या मुखपृष्ठावर करण्यात आला आहे. मागील काही वर्षांमध्ये ‘टाइम’ मासिकाची मोदींबद्दलची भूमिका मोठय़ा प्रमाणात बदलल्याचे पाहायला मिळाले आहे. 2014, 2015 आणि 2017 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समावेश ‘जगातील सर्वांत 100 प्रभावशाली व्यक्ती’च्या यादीमध्ये करण्यात आला होता, मात्र 2019 साली मोदींचा या यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.



























































