
सामना प्रतिनिधी । नगर
नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र तथा संभाजीनगर महानगर पालिकेचे तत्कालीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या प्रशासकीय कामगिरीवर आधारित ‘पुरुषोत्तम’ हा मराठी चित्रपट शुक्रवारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.
नगर येथील पाईपलाईन रोड वरील माय सिनेमा या चित्रपटगृहामध्ये शुक्रवारी संध्याकाळी ७ वाजता या चित्रपटाचा प्रीमिअर शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर, अभिनेत्री देविका दप्तरदार, केतकी अमरापूरकर, अभिनेते नंदू माधव, उमेश घेवरीकर, श्रेणीक शिंगवी, जगदीश कोठाळे, बलभीम पठारे, देवीप्रसाद सोहोनी, अनंत रिसे, राधाकृष्ण कराळे, भगवान राऊत, सहाय्यक दिग्दर्शिका भाग्यश्री राऊत आदी कलावंत उपस्थित होते.
लोकहिताची कामे करणाऱ्या प्रामाणिक व कर्तव्य दक्ष प्रशासकीय अधिकाऱ्यांचे काम जनतेसमोर यावे या हेतूने संवेदना फिल्म फौंडेशन व आदर्श ग्रुप निर्मित, श्रीमती सुनंदा अमरापूरकर प्रस्तुत ‘पुरुषोत्तम’ हा नगरच्या मातीतील चित्रपट नगर जिल्ह्यातील सर्व जनतेने चित्रपट गृहात जाऊन पहावा, असे आवाहन दिग्दर्शिका रिमा अमरापूरकर यांनी यावेळी केले.
पुरुषोत्तम या चित्रपटाच्या माध्यमातून तत्कालीन म.न.पा. आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांची भूमिका मी या चित्रपटात साकारली आहे. आपल्याच मातीतील, आपल्याच माणसांची कामगिरी जाणून घेण्यासाठी नगरकर प्रेक्षकांनी हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन पहावा व पुरुषोत्तमच्या टिमला पाठबळ द्यावे असे आवाहन नंदू माधव यांनी यावेळी केले.
यावेळी सदाशिव अमरापूरकर यांचे बंधू राजाभाऊ अमरापूरकर, प्रा. मकरंद खेर, प्रा. डॉ. बापू चंदनशिवे यांच्यासह नगरच्या साहित्य, कला, क्रीडा, नाट्य, व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
























































