शक्य झाली ताणावर मात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> देवेंद्र भोगले

पूर्वी संसर्गजन्य आजार म्हणजे मोठे आजार मानले जात होते. मानवाने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्यावर मात केली. आधुनिक युगात ताणतणावामुळे होणाऱया आजारांनी मानवासमोर आव्हान निर्माण केले आहे. मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पण या ताणावरही मात करणे आता शक्य होणार आहे. ताणावर मात करणाऱया रेणूंच्या क्षमतेचा शोध मुंबईतील टाटा मूलभूत विज्ञान संस्थेतील (टीआयएफआर) डॉ. विदिता वैद्य आणि डॉ. उल्हास कोल्थूर यांनी लावला आहे. त्यामुळे ताणावर मात करणाऱया प्रभावी औषधांची निर्मिती करता येईल. यासंदर्भात डॉ. विदिता वैद्य यांच्याशी केलेली ही बातचीत…

तुम्ही केलेले संशोधन नक्की काय आहे?
– मेंदूमध्ये चेतातंतू असतात. त्यांना वैद्यकीय भाषेत न्युरॉन असे म्हटले जाते. एक न्युरॉन दुसऱया न्युरॉनपर्यंत संदेश पोहोचवत असतो. त्यानुसार आपला मेंदू शरीरावर नियंत्रण ठेवत असतो. या न्युरॉन्समधील ऊर्जानिर्मिती क्षमता वाढवण्यावर आम्ही संशोधन केले. ताणतणावावर मात करण्यासाठी ही क्षमता जाणून घेणे आणि वाढवणे आवश्यक आहे.

या संशोधनाची सुरुवात नेमकी कशी झाली?
– न्युरॉन्सना काही पदार्थ प्रोटेक्ट करू शकतात यावर आमचे संशोधन सुरू होते. असे अनेक घटक आढळले त्यात सेरेटोनिनही होते. इतर घटकांपेक्षा सेरेटोनिन हे न्युरॉन्सची क्षमता वाढवण्यास जास्तीत जास्त फायदेशीर असल्याचे दिसून आले तेव्हा आम्ही सेरेटोनिनवर लक्ष केंद्रित केले आणि त्या दिशेने या संशोधनाला सुरुवात झाली.

न्युरॉन्सची क्षमता कशी वाढवता येणार?
– न्युरॉन्समध्ये सेरेटोनिन नावाचे रेणू असतात. हे रेणूच न्युरॉन्सची क्षमता वाढवत असतात. त्यांना ऊर्जा देत असतात. या सेरेटोनिनच्या बळावर आपण ताणावर मात करू शकतो. म्हणजेच न्युरॉन्सना पुरेसे सेरेटोनिन मिळाले तर ताण आला तरी आपल्याला त्रास होणार नाही. मानवासाठी हे एक अत्यंत महत्त्वाचे संशोधन आहे.

न्युरॉन्सची क्षमता तपासता येते का? सेरेटोनिनच्या प्रमाणावर परिणाम नेमका कशामुळे होतो?
– न्युरॉन्सची क्षमता तपासता येते. माणसाची स्मृती किती आहे यावर न्युरॉन्सच्या क्षमतेचा अंदाज घेता येतो. काहींना काल काय केले हे आज आठवत नाही तर काहींना काही क्षणापूर्वी आपण काय केले हेसुद्धा विसरायला होते. सेरेटोनिनच्या प्रमाणावर ताणतणाव आणि आजारांमुळे परिणाम होतो. माणसाच्या वयोमानानुसारही ते कमी होत जाते. अल्झायमर आणि पार्किन्सनसारखे आजार असलेल्या रुग्णांमध्ये हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येते.

शरीराला नैसर्गिकरीत्या सेरेटोनिन मिळू शकते का?
– नक्कीच. सेरेटोनिन वाढवण्यासाठी औषधे आहेतच, पण केवळ औषधांनीच सेरेटोनिन वाढवता येत नाही. औषधे ही आजारपणातच दिली जातात. पण आपण नैसर्गिकरीत्याही सेरेटोनिन वाढवू शकतो. फळेयुक्त आहार आणि व्यायामामुळेही सेरेटोनिनचे प्रमाण वाढते. विशेषतः ऍमिनो ऍसिडयुक्त आहार सेरेटोनिन चांगल्या प्रमाणात वाढवू शकतो.

या संशोधनासाठी किती कालावधी लागला?
– पाच वर्षे आम्ही हे संशोधन करत होतो. मी आणि डॉ. कोल्थूर यांच्याप्रमाणेच या संशोधनाच्या यशाचे श्रेय आमच्या संपूर्ण टीमला आहे. कस्तुरबा हेल्थ सोसायटीमधील वैद्यकीय संशोधन केंद्रातील डॉ. अशोक वैद्य यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.

संशोधनासाठी किती खर्च झाला?
– संशोधनासाठी कधीही आम्हाला आर्थिक अडचण आली नाही. केंद्र सरकारकडून त्यासाठी कधी मर्यादाही घातली गेली नाही. संशोधन करण्यासाठी जे-जे काही आवश्यक होते ते सर्व आम्हाला उपलब्ध होते. त्यामुळेच आम्ही हे संशोधन पूर्णत्वास नेऊ शकलो. जगामध्ये अद्याप जे झाले नाही ते आम्ही करून दाखवले याचा आम्हाला अभिमान आहे.

या संशोधनाची आंतरराष्ट्रीय पातळीवरही दखल घेतली गेली.
– होय. ‘प्रोसिडिंग ऑफ नॅशनल ऍकॅडमी ऑफ सायन्सेस’ या प्रथितयश नियतकालिकामध्ये आमच्या या संशोधनाबद्दलचा प्रबंध प्रसिद्ध झाला. गेल्या डिसेंबरमध्ये आम्ही हा प्रबंध पाठवला होता.

प्राण्यांवर प्रयोग यशस्वी झाला, मानवावर कधी?
– हे संशोधन आम्ही उंदरांच्या मेंदूवर केले. ते यशस्वी झाले. आता मानवी मेंदूवर त्याचा प्रयोग करावा लागेल. त्यासाठी स्टेम सेल्सचा वापर करायचा आमचा मानस आहे. पण अद्याप ते फक्त विचाराधीन आहे.

मेंदूतील पेशी आयुष्यभर साथ देतात
मेंदू हा शरीरातील एक असा अवयव आहे ज्यातील पेशी आयुष्यभर साथ देतात. इतर अवयवांमधील पेशी मरून नव्या जन्माला येत असतात. दर तीन महिन्यांनी आपल्या त्वचेमध्ये बदल होत असतो. हाडांमधील पेशी सतत बदलत असतात. इतर अवयवांमध्येही तसे बदल होत असतात. पण मेंदूतील पेशी मात्र आयुष्यभर कायम असतात. अपघात किंवा आजारामुळे त्या नष्ट होऊ शकतात, पण इतर अवयवांमधील पेशींप्रमाणे स्वतःहून कधी मरत नाहीत.

[email protected]