अहमदपूरचा पाणी प्रश्न पेटणार,नागरिकांचे मटका फोड आंदोलन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

शहराला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या लिंबोटी धरणात मुबलक पाणी असतानाही नगर परिषदेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला तब्बल ३५ दिवसांनी पाणी पुरवठा करण्यात येत असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत. अनेकदा निवेदने व आंदोलन करूनही न.प. ला जाग येत नसल्याने सोमवारी स्वामी विवेकानंद मित्रमंडळाच्या वतीने मटका फोड व ठोक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. आमच्या मागाण्या मान्य नाही झाल्यास याही पेक्षा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

लिंबोटी धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक असताना नगरपालिकेच्या गलथान कारभारामुळे शहराला पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. याबद्दल शहरात संतापाचे वातावरण आहे .याबाबत पालिकेला जाब विचारण्यासाठी स्वामी विवेकानंद मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी नगराध्यक्ष आश्विनी कासनाळे व मुख्याधिकारी जाधववर यांच्या कॅबिन समोर मटके फोडून पालिकेचा निषेध केला.

दरम्यान या आंदोलनाची पूर्व कल्पना दिली असतानाही आंदोलनकर्त्यांचे निवेदन घेण्यासाठी न.प. मुख्याधिकारी रामकृष्ण जाधवर व नगराध्यक्षा आश्विनी कासनाळे व न.प. चा एकही कर्मचारी उपलब्ध नसल्यामुळे संताप व्यक्त करण्यात आला आणि न.प. विरोधात निषेध व्यक्त केला. प्रचंड गदारोळानंतर नगराध्यक्षांच्या पतीने निवेदन स्विकारले. तात्काळ शहराला पाणी पुरवठा करण्याची मागणी निवेदनाव्दारे करण्यात आली आहे.