
सामना प्रतिनिधी । नेवरगाव
ममदापूर येथील चतुर्भुज नारायणाच्या यात्रेची सांगता बारागाड्या ओढून करण्यात आली. शेकडो वर्षांपासून चालत आलेली यात्रेची परंपरा गावाचे जायकवाडी प्रकल्पादरम्यान पुनर्वसन होऊनही ग्रामस्थांनी भक्तिभावाने जपली आहे.
चतुर्भुज नारायणाची मूर्ती अतिशय सुंदर व मोहक संगमरवरी आहे. शेकडो वर्षांपूर्वी गोदावरीला आलेल्या महापुरात चतुर्भुज नारायणाची ही मुर्ती ममदापूरच्या किनाऱ्याला लागली. मूर्तीला चार हात असून, हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म असल्याने चतुर्भुज नारायण म्हटले जाते. मूर्तीवर अतिशय सुंदर नक्षीकाम केले आहे. या मूर्तीच्या पायथ्याशी चार पार्शद आहेत. गावाचे पुनर्वसन झाल्यानंतर ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिभावाने वाजतगाजत जुन्या गावातून मूर्तीला नवीन ममदापूर येथे आणून वेदमत्रांच्या जयघोषात वैकुंठवासी सरलाबेटचे सद्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा केली होती.
यात्रेला पंचक्रोशीतील भाविक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित असतात. यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे येथे ओढल्या जाणाऱ्या बारागाड्या. गाड्या ओढणाऱ्याला गाडीवान म्हटले जाते. गाडीवान नाना गेणू ताके हे नऊ दिवस उपवास करतात. माणसांनी भरलेल्या भरधाव वेगाने ओढलेल्या गाड्या पाहून आलेले भाविक चतुर्भुज चरणी नतमस्तक होतात. नवसाला पावणारे दैवत म्हणूनही चतुर्भुज नारायण प्रसिद्ध आहेत.































































