
सामना ऑनलाईन । सांगली
कृष्णा नदीपात्रात मगरीने पुन्हा एका मुलाला लक्ष्य करत नदीत ओढून नेल्याची घटना गुरुवारी सांगलीजवळील मौजे डिग्रज या गावात घडली. आकाश मारुती जाधव या 12 वर्षीय मुलावर मगरीने हल्ला करून त्याला ओढून नेले. बेपत्ता मुलाचा शोध सुरू आहे.
आकाशचे आईवडील नदीच्या काठावर असणाऱ्या वीटभट्टीवर काम करतात. चार दिवसांपूर्वीच आकाश शाळेच्या सुट्टीत घरी आला होता. आईवडील वीटभट्टीवर काम करत होते. आकाश दोन बहिणींसोबत नदीवर पोहण्यासाठी आला होता. नदीमध्ये पोहत असतानाच मगरीने आकाशला नदीत ओढून नेले. ही घटना समजताच आकाशचा शोध घेण्यास वनविभागाने सुरुवात केली आहे. वनविभागाचे अधिकारी मनोज कोळी व त्यांचे सहकारी नदीपात्रात मागील बोटीतून आकाशचा शोध घेत आहेत. शोध पथकाला परिसरात 10 ते 12 फूट लांबीच्या मगरीचे दर्शन झाले.
औदुंबर येथील घटनेची पुनरावृत्ती
काही महिन्यांपूर्वी औदुंबरमधील नदीपात्रातील मगरीने एका मुलावर हल्ला केला होता. मुलाला मगरीने ओढून नेले होते. एक दिवसाच्या शोधमोहिमेनंतर मुलाचा मृतदेह नदीपात्रात सापडला होता. या घटनेची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.



























































