
सामना प्रतिनिधी, नांदेड
एप्रिल महिन्याच्या शेवटी मराठवाड्यात व महाराष्ट्राच्या अनेक भागात उष्णतेची लाट आली होती. आता पुन्हा एकदा राज्यात 19 मे पासून तापमानात वाढ होणार असून, नांदेड जिल्ह्याचे तापमान 45 अंशापर्यंत जाऊ शकते, असा इशारा हवामान खात्याने दिला असून, जनतेने याबाबत सतर्क रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यातल्या बऱ्याच भागातील कमाल तापमानात 19 मे पासून वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तविला आहे. विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील बऱ्याच भागातील कमाल तापमानात लक्षणीय वाढ होणार असल्यामुळे 25 मे पर्यंत या भागातील कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक राहतील. या दरम्यान अकोला, नागपूर आणि वर्धा जिल्ह्यांत कमाल तापमान 46 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे, तर चंद्रपूर जिल्ह्यात कमाल तापमान 47 अंशापर्यंत पोहचण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
विदर्भातल्या उर्वरित जिल्ह्यांसह धुळे, जळगाव, नांदेड आणि परभणी जिल्ह्यांत कमाल तापमान 45 अंशापर्यंत पोहचेल. उर्वरित मराठवाडा आणि खान्देशात कमाल तापमान 42 अंशाच्या आसपास राहील असे मत हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 18 ते 21 मे दरम्यान मुंबईतील कमाल तापमानात वाढ अपेक्षित आहे. वाढत्या तापमानापासून विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील लोकांनी काळजी घ्यावी. लोकांनी योग्य प्रमाणात पाणी प्यावे आणि उष्माघाताचे लक्षण आढळल्यास त्यावर लागलीच उपचार करावा असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
























































