राज्यातील २३ धरणे पडली कोरडी: संभाजीनगर, नागपूरात स्थिती बिकट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पुणे

राज्यात दिवसेंदिवस दुष्काळाची परिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात लहानमोठी ३२६७ धरणे आहेत. त्यामध्ये १४१ मोठी धरणे असून, २५८ मध्यम प्रकल्प आणि २८६८ लघु प्रकल्प आहेत. राज्यातील प्रमुख धरणांत फक्त १५ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. प्रमुख धरणांपैकी २३ धरणे कोरडी ठणठणाट झाली आहेत. संभाजीनगर, नागपूर भागात जास्त पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांत सुमारे १७ टक्के पाणी राहिले आहे.

जलसंपदा विभागाचे प्रदेशनिहाय अमरावती, संभाजीनगर, कोकण, नागपूर, नाशिक आणि पुणे असे सहा विभाग केले असून, या प्रत्येक विभागातील पाण्याच्या स्थितीचा आढावा घेण्यात येत आहे. जलसंपदा विभागाने धरणे आणि जलाशयांमधील पाणीसाठ्याचा घेतलेल्या आढाव्यात राज्यात सरासरी १५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याचे असल्याचे समोर आले आहे, तर २३ धरणे कोरडी पडली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा कमी असून, गेल्या वर्षी या दिवसापर्यंत सुमारे २६ टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे यंदा पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे.

संभाजीनगर विभागात धरणांची संख्या सर्वाधिक असली तरी यंदा पाऊस कमी झाल्यामुळे धरणे कोरडी पडू लागली आहेत. या विभागातील धरणांमध्ये सुमारे ३ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. या विभागातील ८ धरणांत शून्य टक्के पाणी आहे. गेल्या वर्षी सुमारे २४ टक्के पाणी शिल्लक होते. नागपूर भागात दरवर्षी अन्य प्रदेशापेक्षा कमी पाणीसाठा असतो. गेल्या वर्षी आतापर्यंत सुमारे १४ टक्के पाणीसाठा होता. या विभागातील ३ धरणे कोरडी पडली असून, फक्त ९ टक्के पाणी राहिले आहे. नाशिक विभागात पावसाचे प्रमाण समाधानकारक असले तरी यंदा पाणीसाठा कमी झाला आहे. गेल्या वर्षी या भागातील धरणात मे महिन्यापर्यंत सुमारे २८ टक्के पाणीसाठा होता. यंदा सुमारे १४.७१ टक्के पाणी आहे.

अमरावती विभागामध्ये आतापर्यंत समाधानकारक स्थिती असून, या प्रदेशातील धरणे आणि जलशयांमध्ये सुमारे २२ टक्के पाणी आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा थोडा जास्त आहे. गेल्या वर्षी सुमारे १९.५६ टक्के पाणीसाठा होता. कोकण विभागात सर्वाधिक सुमारे ३७.३३ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी सुमारे ४३ टक्के पाणी होते.

पुणे जिल्ह्यात ३५ मोठी धरणे, ५० मध्यम धरणे आणि ६४१ लघु प्रकल्प असतानाही यंदा पाणीटंचाईची समस्या उभी राहिली आहे. गेल्या वर्षी या महिन्यात सुमारे २८ टक्के धरणे भरलेली होती. पुणे जिल्ह्यात सध्या सुमारे १६.१९ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील डिंभे, घोड, पिंपळगाव जोगे, वडज आणि टेमघर या धरणांत शून्य टक्के पाणी असून सोलापूरमधील उजनी या धरणांतील उपयुक्त पाणीसाठा संपला आहे.