
सामना प्रतिनिधी, संगमेश्वर
निवळी आणि आरवली येथून येणाऱ्या 33 केव्ही उच्च दाबाच्या दोन्ही वीज वाहिन्यांमधे तांत्रिक बिघाड झाल्याने संगमेश्वर तालुक्याला तब्बल 11 तास विजेविना रहावे लागले. उन्हाळ्यात महावितरणची अशी स्थिती मग पावसाळ्यात काय होणार असा संतप्त सवाल ग्राहकांनी उपस्थित केला आहे.
संगमेश्वर तालुक्याला विज पुरवठा करणाऱ्या दोन उच्च दाब विज वाहिन्या आहेत यातील एक रत्नागिरी निवळीच्या 110 केव्ही उपकेंद्रांतुन 33 केव्हीची वाहिनी थेट संगमेश्वरला येते तर संगमेश्वर तालुक्यातील आरवली येथे असलेल्या 110 केव्ही उपकेंद्रातून 33 केव्ही द्वारे तालुक्याला विजपुरवठा केला जातो. या दोन मधील निवळीतुन येणाऱ्या वाहिनीत यापूर्वीच बिघाड झाला होता. तो दुरुस्त करण्याची तसदी महावितरणने घेतली नव्हती. आरवलीतील केंद्रावर तालुक्याचा विज पुरवठा सुरु होता.
याच दरम्यान काल मध्यरात्री 2 च्या सुमारास आरवली उपकेंद्रातील 33 केव्ही वाहिनीने मान टाकली आणि काहि सेकंदात तालुक्यातील आरवली, संगमेश्वर, देवरुख विभागाचा विजपुरवठा खंडित झाला. अचानक झालेल्या या प्रकाराने जागे झालेल्या महावितरणने तालुक्यातील आपल्या कर्मचाऱ्यांना कामाला लावले. भल्या पहाटे फॉल्टची शोधाशोध सुरु झाली यानंतर आरवलीतील बिघाडाची कल्पना आली.
तब्बल 8 तास प्रयत्न करून आज दुपारी 1 वाजता तालुक्यातील विजपुरवठा सुरळीत करण्यात कर्मचाऱ्यांना यश आले. ऐन उन्हाळ्यात पंखा लावुनही घामाच्या धारा निघत असताना काल मध्यरात्रीनंतर तब्बल 11 तास विजेविना काढावे लागल्याने शेकडो ग्राहकांनी महावितरणच्या या कारभारावर तिव्र नाराजी व्यक्त केली. निवळीतून येणाऱ्या वाहिनीत झालेला बिघाड वेळीच दुरुस्त करण्यातआला असता तर ही वेळ आली नसती असे बोल आज ऐकायला मिळाले. उन्हाळ्यात कोणतीही नैसर्गिक अडचण नसताना ही वेळ मग तोंडावर आलेल्या पावसाळ्यात काय होणार असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.





























































