पणजी पोटनिवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पणजी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेची पोटनिवडणुक उद्या 19 मे रोजी मतदान होणार आहे. मतदानासाठी निवडणूक आयोगाची यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान शांततेत पार पडावे यासाठी पणजी मतदारसंघात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पणजी मतदारसंघातील सगळी मतदान केंद्रे दिव्यांग मतदारांना मतदान करणे सुलभ होईल अशी बनवण्यात आली आहेत. इंस्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा मधील मतदान केंद्र विशेष असणार आहे. येथील सर्व 9 अधिकारी दिव्यांग असून तेच सर्व मतदान प्रक्रिया पार पाडणार आहेत.

अटीतटीच्या लढतीमुळे राज्या बरोबर देशाचे लक्ष सुद्धा पणजी पोटनिवडणुकीकडे लागले आहे. भाजपतर्फे सिद्धार्थ कुंकळ्येकर, काँग्रेसतर्फे बाबुश मोन्सेरात, गोवा सुरक्षा मंचतर्फे सुभाष वेलिंगकर, आप तर्फे वाल्मिकी नाईक यांच्या सह दोन अपक्ष उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. मुख्य लढत भाजप आणि काँग्रेस यांच्यात असली तरी आपचे नाईक आणि गोवा सुरक्षा मंचचे सुभाष वेलिंगकर किती मते काढणार यावर भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून असणार आहे.