
सामना ऑनलाईन । जम्मू
हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी वर्षभरापूर्वी राष्ट्रीय रायफलचे जवान औरंगजेब यांची हत्या केली होती. त्याचा बदला अखेर हिंदुस्थानी जवानांनी घेतला. शहीद औरंगजेबच्या हत्येत सहभागी असलेला दहशतवादी शौकत अहमद डार याच्यासह तिघांना पुलवामा जिह्यातील अनंतनाग (पंजगाम) येथे झालेल्या चकमकीत ठार केले आहे. ठार झालेल्या तिघांचही ओळख पटली असून यामध्ये हिजबुलच्या कमांडरचाही समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पंजगाम गावात दहशतवादी लपल्याची माहिती मिळताच 130 बटालियन सीआरपीएफ, 55 राष्ट्रीय रायफल आणि स्पेशल ऑपरेशन ग्रुपच्या जवानांनी रात्रीपासूनच शोधमोहीम सुरू केली. त्यानुसार झालेल्या चकमकीत अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असलेला शौकत अहमद डार, इरफान वार आणि मुजफ्फर शेख यांचा खात्मा झाला. शौकत डार आणि त्याचे साथीदार गेल्या चार वर्षांपासून पुलवामा भागात सक्रिय होते. शहीद जवान औरंगजेबच्या हत्येमध्येही त्याचाच हात असल्याचे बोलले जात आहे. या कारवाईत दहशतवाद्यांकडून मोठय़ा प्रमाणात शस्त्रसाठा जप्त केला आहे. जम्मू-कश्मीरच्या काही भागांमध्ये दहशतवादी हल्ला होण्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली आहे. त्या पार्श्वभूमीवर कश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांना ऍलर्ट देण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कश्मीर खोऱ्यात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमधील चकमकींचे प्रमाण वाढले आहे. यावरून दहशतवादाचा धोका केवळ सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवाद्यांकडूनच नाही तर कश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांकडून असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अनंतनागमधील देहरूना गावात चकमक सुरूच
अनंतनागमधील देहरूना गावात जवान आणि अतिरेक्यांमध्ये अद्याप चकमक सुरूच आहे. अतिरेकी लपलेल्या ठिकाणाला जवानांनी चारही बाजूंनी घेरले असून गोळीबार सुरू आहे.



























































