
सामना ऑनलाईन । मुंबई
इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे ते 14 जुलै या कालावधीत आयोजित आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या तिकिटांवर क्रिकेट शौकिनांच्या अक्षरशः उड्या पडत आहेत. या स्पर्धेत 48 लढती होणार आहेत. या सामन्यांच्या आठ लाख तिकिटांसाठी 148 देशांतून जवळपास तीन कोटी अर्ज आले आहेत. हे तिकीट मिळवण्यासाठी चाहत्यांना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागणार आहे.
क्रिकेटचा महासंग्राम अर्थात ‘वन डे वर्ल्ड कप.’ इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून या महत्त्वाच्या क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होत आहे. जसजशी ही तारीख जवळ येत चालली आहे तसतशी क्रिकेट चाहत्यांची उत्सुकता अधिकच वाढत चालली आहे. सर्वांच्या मनात एकच सवाल आहे 2019 च्या वर्ल्ड कपवर कोणता देश आपले नाव कोरणार?. इंग्लंड पाचव्यांदा वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवत आहे. यापूर्वी त्यांनी 1975, 1979, 1983 आणि 1999 मध्ये विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते. पण यंदाचा इंग्लंड संघाचा फॉर्म पाहता हा वर्ल्ड कप तेच जिंकणार असा दावा केला जात आहे. त्यापाठोपाठ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱया टीम इंडियाचा क्रमांक येतो. त्यामुळेच या दोन संघांच्या सामन्यांच्या तिकिटांना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यांच्या तिकिटांची किंमतही अन्य संघांच्या तुलनेत अधिक आहे.
सर्वात स्वस्त तिकीट 3500 रुपयांचे
विश्वचषकाच्या तिकिटांचा काळाबाजार होऊ नये याकरिता आयसीसी करडी नजर ठेवून आहे. हिंदुस्थान आणि इंग्लंडच्या चाहत्यांना स्पर्धेच्या तिकिटांसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. या स्पर्धेतील सर्वात स्वस्त तिकीट हे 40 डॉलर म्हणजेच 3500 रुपयांचे आहे, परंतु ही किंमत केवळ इंग्लंड विरुद्ध बांगलादेश आणि अफगाणिस्तान विरुद्ध हिंदुस्थान या लढतींसाठीच आहे.
ऑस्ट्रेलियन संघ प्रमुख दावेदार – गंभीर
टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याच्या मते बलाढय़ ऑस्ट्रेलियन संघच 2019 च्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेच्या जेतेपदासाठीचा प्रमुख दावेदार आहे. त्यापाठोपाठ टीम इंडिया आणि यजमान इंग्लंडचा क्रमांक येतो. ऑस्ट्रेलिया दावेदारांत आघाडीवर असेल. अंतिम फेरीत ते नक्की खेळतील, परंतु फायनलमधील दुसरा दावेदार हा हिंदुस्थान किंवा इंग्लंड यांच्यापैकी एक असेल. इंग्लंडचा संघ सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. त्यांच्याकडे बेन स्टोक्स व मोईन अलीसारखे तगडे अष्टपैलू खेळाडू आहेत, असे मत माजी सलामीवीर फलंदाज गंभीरने व्यक्त केले आहे.





















































