मुंबई-नाशिक महामार्गावर आता चुकीला माफी नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मंगेश सौंदाळकर । मुंबई

मुंबई-नाशिक महामार्गावर वाहतुकीचे नियम मोडणाऱया चालकांना आता त्यांच्या चुकीला माफी नाही. चालकांना शिस्त लागावी आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे याकरिता पहिल्यांदाच झीरो टॉलरन्स नावाचा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबवला जात आहे. या उपक्रमाअंतर्गत साध्या वेशातील पोलीस हे खासगी वाहनांतून तेथे गस्त घालणार आहेत.

राज्यातील प्रमुख महामार्गांपैकी मुंबई-नाशिक हा एक महामार्ग आहे. साधारण 96 किलोमीटरच्या महामार्गावर दिवसाला हजारो वाहनांची ये-जा असते. या महामार्गावर होणारे अपघात हे बहुतांश चालकांच्या चुकीमुळे झाले आहेत. अतिवेगाने वाहन चालवणे, चुकीच्या मार्गावर वाहन थांबवणे यामुळे अपघाताचे प्रकार घडतात. अपघात रोखण्याबाबत केंद्रीय महामार्ग प्राधिकरण, महामार्ग पोलिसानी काही दिवसांपूर्वी चर्चा केली. चालकांना शिस्त लागावी या हेतूने महामार्ग पोलिसांनी या महामार्गावर झीरो टॉलरन्स नावाचा उपक्रम सुरू केला.

महामार्ग पोलिसांनी नेमके अपघात कोणत्या कारणामुळे होतात याची माहिती जाणून घेतली. झीरो टॉलरन्स उपक्रमाअंतर्गत आता साध्या वेशातील पोलीस गस्त घालणार आहेत. जर वाहतुकीचे नियम मोडताना कोणी चालक आढळल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. महामार्गावर होणारे अपघात पाहता पोलिसांनी काही दुभाजकाच्या ठिकाणी उपाययोजना केल्या आहेत. दुभाजकाच्या ठिकाणाहून काही चालक हे वाहन नेत असायचे. त्यामुळे काही अपघात झाल्याचे महामार्ग पोलिसांचे म्हणणे आहे. तसेच पोलिसांनी या महामार्गावरील वडपे -गोंदे येथील अपघातप्रणव ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) तेथे उपाययोजना केल्या आहेत.

तीन महिन्यांत 161 अपघात

मुंबई-नाशिक महामार्गावर जानेवारी ते मार्चदरम्यान 161 अपघात झाल्याची नोंद आहे. गंभीर अपघातांत 71 जणांचा मृत्यू झाला होता तर 87 जण गंभीर जखमी असल्याची नोंद आहे. अपघातांत मृतांचा विचार केला तर नाशिक ग्रामीण येथे 28, ठाणे ग्रामीण 22, ठाणे शहर 16 आणि नाशिक शहर 5 अशी नोंद आहे. गंभीर जखमींमध्ये ठाणे ग्रामीणमध्ये 36 आणि ठाणे शहर 25 तर नाशिक ग्रामीण 22 अशी नोंद आहे.

28 हजार 809 वाहतूक परवाने निलंबनाकरिता पाठवले

बेशिस्त चालकांना शिस्त लागावी आणि अपघात कमी व्हावेत याकरिता महामार्ग पोलीस विविध उपक्रम हाती घेत आहे. गेल्या तीन महिन्यांत राज्यात 2 लाख 44 हजार 883 जणांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले आहे. त्यापैकी 28 हजार 809 जणांचे वाहन परवाने निलंबनाकरिता प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत. ओव्हरस्पीडिंगचे 1 हजार 851, वाहन चालवताना मोबाईलवर बोलणारे 10 हजार 260, लाल सिग्नल जंप करणे 2 हजार 503, दारू पिऊन वाहन चालवणे 5 हजार 42 आणि अन्य कारवाईत 418 जणांचे हे परवाने आहेत.

महामार्गावर झीरो टॉलरन्स हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षी राज्यात बहुतांश अपघात हे अतिगतीमुळे झाले आहेत. चालकांनी गतीवर नियंत्रण ठेवावे. जे चालक थकले असतील त्यांनी योग्य विश्राती घ्यावी. वळणावर वाहने उभी करू नयेत.
विजय पाटील, पोलीस अधीक्षक ( मुख्यालय), महामार्ग पोलीस