पुण्यातील धरणात मुंबईतील तिघे बुडाले, ‘एनडीआरएफ’ जवानांमुळे पती-पत्नीसह मुलीला जीवदान 

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त माहेरी आलेल्या नणंदेचे कुटुंब फिरण्यासाठी धरणावर गेले असता तोल जाऊन पडल्याने सात वर्षांच्या मुलासह तिघांचा बुडून मृत्यू झाला. ‘एनडीआरएफ’ जवानांच्या प्रसंगावधानामुळे या घटनेतून पती-पत्नीसह मुलगी बचावली. ही घटना मावळ तालुक्यातील नवलाख उंबरे येथील जाधववाडी धरणात रविवारी सकाळी घडली.

अनिल कोंडीबा कोळसे (58), प्रीतेश रघुनाथ आगळे (32, दोघे राहणार घाटकोपर, मुंबई) आणि प्रशील अमोल अढाव (7, राहणार वाशी, मुंबई) अशी मृत्युमुखी पडलेल्या तिघांची नावे आहेत. याप्रकरणी संगीता दादासाहेब गायकवाड (43, राहणार येलवाडी, ता. खेड) यांनी तळेगाव-एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. एमआयडीसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने यांनी याबाबत माहिती दिली. रविवारी सर्वजण जाधववाडी धरणावर फिरायला गेले. कुटुंबातील काहीजण पाण्यात उतरले. यावेळी अनिल यांचा अचानक पाय घसरून तोल गेला. त्यामुळे त्यांनी त्यांच्या मागे नातू प्रशीलसह उभे असलेले संगीता यांचे पती दादासाहेब यांना पकडले. यात दादासाहेब यांच्यासह नातू प्रशीलही पाण्यात बुडाले. त्यांना वाचविण्यासाठी संगीता आणि त्यांची मुलगी उत्कर्षा यांनी धाव घेतली, मात्र त्याही बुडू लागल्या. त्यामुळे इतर नातेवाईकांनी आरडाओरडा सुरू केला. याचवेळी धरणालगत तळेगाव ‘एनडीआरएफ’च्या जवानांचे शिबीर सुरू होते. आरडाओरडा ऐकून जवानांनी बोटीसह घटनास्थळी धाव घेतली आणि संगीता व उत्कर्षा यांना त्वरित बाहेर काढल्यामुळे दोघी बचावल्या. त्यानंतर इतर चौघांना पाण्याबाहेर काढून तळेगाव जनरल रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच तिघांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.