पणजी पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पणजी

माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पणजी विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी 75.25 टक्के मतदान झाले.किरकोळ प्रकार वगळता मतदान शांततेत पार पडले. या पोटनिवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लोकसभेच्या निवडणुकांबरोबर जाहीर केला जाणार आहे.

एकूण 22 हजार 482 पैकी 8 हजार 119 पुरुषांनी तर 8,799 महिलांनी मतदानाचा हक्क बजावला.महिला आणि पुरुष मिळून एकूण 16 हजार 918 मतदारांनी रविवारी मतदानाचा हक्क बजावला. पणजी मतदारसंघात एकूण 115 दिव्यांग मतदार नोंदणीकृत होते. त्यापैकी 101 जणांनी मतदान केले. त्याची सरासरी 87.82 टक्के आहे.

सर्वाधिक मतदान 16 नंबर मतदान केंद्रावर 89.86 टक्के तर सर्वात कमी मतदान 15 नंबर मतदान केंद्रावर 63.96 टक्के झाले. गोवा सुरक्षा मंचचे उमेदवार सुभाष वेलिंगकर यांनी मतदान केंद्र 9 वर मतदान केले. भाजपचे उमेदवार सिद्धार्थ कुंकळ्येकर यांनी जुंता हाउस मधील 21 नंबरच्या मतदान केंद्रात जाऊन मतदानाचा हक्क बजावला. केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी रायबंदर येथील मतदान केंद्र 1 वर जाऊन मतदान केले. आपचे वाल्मिकी नाईक आणि काँग्रेसचे उमेदवार बाबुश मोन्सेरात यांचे मतदान पणजी मतदारसंघात नसल्याने त्यांना मतदान करता आले नाही.