तिसर्‍या मोर्चासाठी चंद्राबाबू यांची मोर्चेबांधणी सुरूच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । कोलकाता

लोकसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला तरी मोदी यांच्या नेतृत्वात ‘एनडीए’चे सरकार केंद्रात येऊ नये यासाठी विरोधकांनी जोरदार हालचाली सुरू केल्या आहे. 2014 मध्ये एनडीएसोबत असणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असणार्‍या चंद्राबाबू नायडू यांनी त्यासाठी पुढाकार घेतला असून कोलकाता येथे त्यांनी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळण्याचा अंदाज क्यक्त केला आहे, मात्र चंद्राबाबू नायडू यांनी त्यापूर्वीच भाजपविरोधातील सर्व राजकीय पक्षांना एकत्र करून तिसर्‍या मोर्चाची बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर सोमवारी त्यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन चर्चा केली.

अखिलेश-मायावती उचलणार पुढचं पाऊल

सर्वच एक्झिट पोलमध्ये उत्तर प्रदेशात भाजपला कमी जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांची भेट घेऊन संभाव्य परिस्थितीबाबत चर्चा केली. अखिलेश यांनी या भेटीनंतर आता पुढचे पाऊल टाकण्याची तयारी असे कॅप्शन देत एक फोटो ट्किटर अकाऊंटवरून पोस्ट केला.