पंचांग सांगतेय-जुन-जुलैमध्ये हत्ती पाडणार जोरदार पाऊस

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

हिंदुस्थानच्या हवामान खात्याने आणि स्कायमेट या खासगी हवामान विभागाने मान्सून कधी येणार, पाऊस किती पडणार याबाबतचा आपला अंदाज व्यक्त केला. आता पंचांगातही यंदाच्या पावसाबद्दल अंदाज व्यक्त करण्यात आला असून जून तसेच जुलैमध्ये हत्ती वाहनावरून पाऊस येणार आहे. या दोन महिन्यांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हिंदुस्थानी आणि खासगी हवामान विभागाने जूनमध्ये विदर्भ आणि मराठवाडय़ात पावसाचे प्रमाण कमी राहील असे म्हटले आहे. त्यामुळे पंचांगाने व्यक्त केलेला अंदाज शेतकऱयांनाही दिलासा देणारा ठरणार आहे.

22 जून ते 5 जुलैदरम्यान पावसाचे वाहन हत्ती असून आर्द्रा नक्षत्राला सुरुवात होत आहे. बेडूक, म्हैस आणि हत्ती वाहन असताना जोरदार पाऊस पडतो, असे पंचांग सांगते. तर मोर, गाढव आणि उंदीर वाहन असताना कमी पाऊस पडतो. 3 ते 16 ऑगस्ट दरम्यान पाऊस बेडूक या वाहनावरून येणार आहे. त्यामुळे यादरम्यान चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे.

कोल्हा आणि मेंढा हे वाहन असताना अल्प प्रमाणात पाऊस पडतो तर घोडा वाहन असताना पर्वत रांगांवर चांगला पाऊस पडतो असे पंचांग सांगते. यंदा 6 जुलै ते 19 जुलै दरम्यान पाऊस मेंढय़ावरून येणार आहे. त्यामुळे यादरम्यान अल्प पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे पंचांगात म्हटले आहे.

पंचांगातील पावसाचे अंदाज हे केवळ ठोकताळे असतात. अनेक वर्षांपासून असे अंदाज बांधण्यात येत आहेत. ते कधी चुकतात तर कधी बरोबर येतात. अर्थात ते वेधशाळेच्या अंदाजाप्रमाणे वैज्ञानिक निकषावर आधारलेले नसतात, असेही दा. कृ. सोमण यांनी म्हटले आहे.

कोणत्या दिवसात पावसाचे कोणते वाहन
नक्षत्र तारीख वाहन
मृग                8 ते 21 जून उंदीर
आर्द्रा              22 जून ते 5 जुलै हत्ती
पुनर्वसू            6 जुलै 19 जुलै मेंढा
पुष्य               20 जुलै ते 2 ऑगस्ट गाढव
आश्लेषा          3 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट बेडूक
मघा              17 ते 30 ऑगस्ट उंदीर
पूर्वा फाल्गुनी    31 ऑगस्ट ते 12 सप्टेंबर घोडा
उत्तरा फाल्गुनी  13 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर मोर
हस्त              27 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर गाढव
चित्रा             11 ऑक्टोबर ते 23 ऑक्टोबर बेडूक
स्वाती            24 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर उंदीर